लाच प्रकरण : निलंबित पोलीस हवालदार तळकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th April, 05:31 pm
लाच प्रकरण : निलंबित पोलीस हवालदार तळकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

पणजी : पॅराग्लायडिंग व्यावसायिकाकडे लाच मागितल्याप्रकरणी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) पोलीस हवालदार संजय तळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तळकर याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. याबाबतचा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश शैरीन पाॅल यांनी दिला आहे.

या प्रकरणी पृथ्वी एच. एन. या पॅराग्लायडिंग व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी केरी किनारी पोलीस स्थानकाचे हवालदार संजय तळकर यांनी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याचे म्हटले आहे. याची दखल घेऊन एसीबीचे उपअधीक्षक राजन निगळे याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मेलिटो फर्नांडिस यांनी तळकर याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याची माहिती तळकर याला मिळाल्यानंतर त्याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संजय यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे निरीक्षण नोदवून न्यायालयाने तळकर यानी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

दरम्यान लाच प्रकरणी आरोपाची तसेच एसीबी दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेऊन किनारी पोलीस अधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांनी आदेश जारी करून हवालदार संजय तळकर यांना सेवेतून निलंबित केले.