डेटिंग एपद्वारे कांसावलीतील रहिवाशाला घातला १.३५ कोटींचा गंडा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 04:39 pm
डेटिंग एपद्वारे कांसावलीतील रहिवाशाला घातला १.३५ कोटींचा गंडा

वास्को : डेटिंग अ‍ॅपचा वापर करून ओरोसी-कांसावली येथील डेलेनो बॉस्को फर्नांडिस या जहाजावरील खलाशाला तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांना लुटल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी दोन महिलांसह तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशियातांची ओळख पटली असून ते सर्वजण अंगडी-मुकेरी (कर्नाटक) येथील आहेत. तथापि, या प्रकरणातील तेच आरोपी आहेत की, त्यांच्या नावांचा इतरांनी वापर केला आहे, यासंबंधी तपास करण्यात येत आहे, अशी माहिती वास्कोचे उपअधीक्षक  संतोष देसाई यांनी दिली.

डेलेनो फर्नांडिस हा खलाशी असून दर सहा महिन्यांनी तो गोव्यात येतो. फर्नांडिसला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार २०२२ ते २०२३ या कालावधीत घडला आहे. कर्नाटकातील झीटा फर्नांडिस व इतरांनी प्रथम ‘चॅट करो’ या डेटिंग अ‍ॅपच्या आधारे डेलेना याच्याशी संपर्क साधला. या अ‍ॅपद्वारे त्यांच्यात चॅट चालू असतानाच एके दिवशी झीटाने व्हीडीओ कॉल केला. नंतर व्हीडीओ कॉलचा गैरवापर करत झीटा व इतरांनी डेलेनो याला आपल्या जाळ्यात अडकविले. नंतर त्या व्हीडीओचा वापर करत त्यांनी डेनेलो ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मागितलेली रक्कम न दिल्यास त्याचा आपेक्षार्ह व्हीडीओ ऑनलाईन अपलोड करण्याची धमकी डेलेनो याला मिळू लागली. त्यामुळे घाबरलेल्या डेलेनोने त्याच्या मागणीनुसार रक्कम देण्यास सुरुवात केली. त्या त्रिकुटाने दिलेल्या निरनिराळ्या बँक खात्यांमध्ये तो एटीएममध्ये रोकड जमा करत होता. तो त्यांच्या मागण्या पूर्ण करीत असल्याने त्या त्रिकुटाने त्याला १ कोटी ३५ लाख रुपयांना लुटले. शेवटी ब्लॅकमेलिंगला कंटाळून डेलेनो याने वेर्णा पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली. 

या तक्रारीची दखल घेऊन वेर्णाचे पोलीस निरीक्षक नेल्सन कुलासो यांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी झीटा फर्नांडिसह मेरी फर्नांडिस, शंकर जाधव (सर्वजण कर्नाटक) यांची ओळख पटली. त्यांच्या विरोधात भा.दं.सं. ४२० व ३८४ कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, अशाप्रकारच्या चॅट अ‍ॅपला नागरिकांनी बळी पडू नये. अशा चॅट अ‍ॅपप्रकरणी संशय आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक देसाई यांनी केले आहे.

हेही वाचा