वेर्णा आयडीसीला पाणी पुरवणारी वाहिनी फुटल्याने दवर्लीत लाखो लीटर पाणी वाया

घरगुती पुरवठ्यावर परिणाम नाही : वेर्णा औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी वाहिनी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 03:11 pm
वेर्णा आयडीसीला पाणी पुरवणारी वाहिनी फुटल्याने दवर्लीत लाखो लीटर पाणी वाया

मडगाव : दवर्ली येथील पॉवर हाऊसजवळील इमारतींच्या मागील बाजूला असलेल्या नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना वेर्णा औद्योगिक वसाहतीला (आयडीसी) पाणी पुरवठा करणारी वाहिनी फुटली. यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले. जलस्त्रोत खात्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने घरगुती पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असे अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.

दवर्ली येथे जलस्त्रोत खात्याकडून नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी चर खोदणे व दगडाचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी जेसीबीचा वापर करून खोदकाम केले जात असताना ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे पाण्याचे कारंजे उडू लागले व जलवाहिनीचा व्हॉल्व्ह बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहून गेले. जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आल्यावर पाहणी केली व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केलेली असल्याचे सांगितले. जी ७०० मिमी जलवाहिनी फुटलेली आहे, ती जलस्त्रोत खात्याच्या अखत्यारीतच येत असून या जलवाहिनीतून दवर्लीतून वेर्णा औद्योगिक वसाहतीला कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे घरगुती पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा माहिती मिळाल्यावर तत्काळ बंद केलेला असून दुरुस्ती कामाला सुरुवात केली जात असल्याचेही स्पष्ट केले.‍


हेही वाचा