मडगाव रेल्वे स्थानकाजवळ बेवारस पिशवीत सापडली ९ हजारांची दारू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 02:41 pm
मडगाव रेल्वे स्थानकाजवळ बेवारस पिशवीत सापडली ९ हजारांची दारू

मडगाव : येथे रेल्वे स्थानकाजवळ एका हॉटेलसमोर आढळलेल्या बेवारस पिशवीत चक्क ९ हजारांची दारू सापडली आहे. या दारूच्या बाटल्या मडगाव पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांना पाहून कोणीतरी ही पिशवी तिथेच सोडून गेल्याचा प्राथमिक कयास आहे.

मडगाव पोलीस काल शहरात गस्त घालत होते. हवालदार गोरखनाथ गावस व शिपाई सुभानी शेख यांच्या पथकाला मडगाव रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेलसमोर एक पिशवी आढळली. त्या पिशवीच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यामुळे पथकाने  पिशवीची पाहणी केली असता त्यात रॉयल व्हिस्कीच्या २१, रॉयल क्लासिकोच्या ११५, अॅपल व्होडकाच्या १६ यांसह अन्य कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

पथकाने हा मद्यसाठा जप्त केला आहे. बाजारभावानुसार या दारूची किंमत ८ हजार ९८६ रुपये एवढी होत आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव पोलीस पिशवी कोण सोडून गेले, त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा