गोव्यातून ७.९८ लाखांची रोकड घेऊन जात होता कर्नाटकात; निवडणूक पथकाने केले जप्त

संशयित म्हणाला, ‘मी वागातोर येथील हॉटेलचा कर्मचारी, हा माझा चार वर्षांचा पगार’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th March, 12:15 pm
गोव्यातून ७.९८ लाखांची रोकड घेऊन जात होता कर्नाटकात; निवडणूक पथकाने केले जप्त

पणजी : गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने पैशांची बंडले घेऊन निघालेल्या एका संशयिताला कणकुंबी तपास नाक्यावर कर्नाटक निवडणूक आयोगाच्या पथकाने अडवले. यावेळी झडती घेतली असता त्याच्याजवळ ७ लाख ९८ हजारांची रोकड सापडली. याविषयी विचारणा केली असता, ‘मी वागातोर येथे एका हॉटेलचा कर्मचारी असून, हे माझे चार वर्षांचे वेतन आहे’, असे उत्तर त्याने दिले. मात्र, या विषयी कोणतीही वैध पावती अथवा दस्तावेज दाखवला नाही. त्यामुळेलोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सर्व रोकड जप्त करण्यात आली आहे. ही माहिती खानापूरचे सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चौहान यांनी ‘गोवन वार्ता’ला दिली.

बेळगाव जिल्ह्यातील गांधी नगर ओनी, वन्नूर येथील संजय बसवराज रेड्डी नामक संशयित आज सकाळी ८.३० वाजता गोव्याहून चोर्ला घाटातून बेळगावला निघाला होता. कणकुंबी येथील अबकारी खात्याच्या तपास नाक्यावर पोहोचल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे खानापुरा विधानसभा मतदारसंघातील खानापुरा तालुक्याच्या निवडणूक पथकाने त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे ७ लाख ९८ हजार रुपयांची रोकड सापडली. हे पैसे कुठून आणले? याची चौकशी केली असता, त्याने दिलेले उत्तर पथकाला संदिग्ध वाटले. ‘मी वागातोर येथे एका हॉटेलचा कर्मचारी आहे. माझे चार वर्षांचे वेतन आज मला मिळाले आहे. ते घेऊन घरी जात आहे’, असे उत्तर त्याने दिले. मात्र, त्याच्याकडे याची वैध वेतन पावती अथवा अन्य दस्तावेज नव्हते.

त्यामुळे पथकाने ही रक्कम जप्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा हा भंग असल्याने ही कारवाई करण्यात आली. याचा पंचनामा पथकाचे अधिकारी मलगौडा पाटील यांनी केला असून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे, असे चौहान यांनी सांगितले.

पैसे घेऊन फिरण्यासंदर्भात ‘अशी’ आहे आचारसंहिता

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून देशभरात लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक काळात एखादा व्यक्ती कागदपत्रांशिवाय ५० हजारांहून अधिक रोख रक्कम घेऊन फिरताना आढळल्यास ती तत्काळ जप्त करण्याचा आदेश भारतीय निवडणूक आयोगाने यंत्रणांना दिला आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास अधिकृत कागदपत्रे दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा