‘या’ देशात १ एप्रिलपासून पाऊस पडल्यावर भरावा लागणार कर! नागरिकांवर बोझा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th March, 12:14 pm
‘या’ देशात १ एप्रिलपासून पाऊस पडल्यावर भरावा लागणार कर! नागरिकांवर बोझा

ओट्टावा : देशाचा विकास आणि प्रशासन चालवण्यासाठी कराच्या रुपात जनतेकडून पैसे घेतले जाता. यात घरपट्टीपासून रस्त्यांवरील टोलनाक्यांपर्यंत आणि स्वयंपाकघरातील मीठापासून घामाने मिळवलेल्या पैशांतील ठरावीक रक्कम सरकार करूपात काढून घेते. हा बोझा कमी नसतो. त्यात एका देशाने चक्क पाऊस पडल्यावर नागरिकांकडून कर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ एप्रिलपासून तेथे लागू होणार आहे.

तुम्ही यापूर्वी कधी ‘रेन टॅक्स’ अर्थात पावसावर कर लावल्याचे ऐकले आहे का? कदाचित उत्तर नाही असेल. कॅनडाचे सरकार मात्र पुढील महिन्यापासून रेन टॅक्स लागू करणार आहे. तेथील सरकारनेही याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांत टोरंटो शहरासह जवळजवळ संपूर्ण कॅनडा देशात बर्फ वितळून बनणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन ही एक मोठी समस्या बनली आहे. अशा पाण्यामुळे लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या वाढत्या त्रासाची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे. टोरंटोच्या अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पाणी वापरणारे आणि इच्छुक संस्थांच्या सहकार्याने या पाणी व्यवस्थापनास ‘वादळ पाणी शुल्क’ आणि ‘जल सेवा शुल्क’ असे नाव देण्यात आले आहे.

कॅनडामध्ये पावसासोबतच भरपूर बर्फवृष्टीही होते. बर्फवृष्टीमुळे पाणी जमिनीतून शोषले जात नाही. ते झाडांवर व बाहेर रस्त्यांवर जमा होते. शहरांमध्ये घरे, रस्ते सर्व काही काँक्रीटचे बनलेले आहे. अशा स्थितीत पाणी लवकर आटतही नाही. नंतर रस्त्यावर वाहू लागते. त्यामुळे रस्ते, नाले तुंबण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या समस्येला ‘रेन ऑफ’ म्हणतात. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने ‘स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम’ तयार केली आहे. या प्रणालीद्वारे जमा झालेले अतिरिक्त पाणी बाहेर काढले जाईल. यामुळे पाण्याचा निचरा होईल.

पाऊस कर म्हणजे काय?

काँक्रीटची घरे असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ज्यांच्या घरातून सांडपाणी वाहिनीमध्ये जितके जास्त पाणी वाहत जाईल, तितका अधिक कर त्यांच्याकडून वसूल केला जाईल. या नियमालाच ‘रेन टॅक्स’ म्हटले जात आहे. मात्र, कॅनडा सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत आणि निषेध करत आहेत.

टोरंटो प्रशासन शहरातील सर्व मालमत्तांवर याची अंमलबजावणी करणार आहे. यामध्ये इमारती, कार्यालये, हॉटेल आणि रेस्टॉरंट आणि इतर अनेक ठिकाणांचा समावेश आहे. टोरंटो शहरातील लोक पाण्यावर कर भरतात. यामध्ये स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटच्या खर्चाचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत नवा कर लागू झाल्यानंतर लोकांवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी होणार असल्याने लोकांचा विरोध होत आहे.

कर कसा मोजला जाईल?

प्रत्येक क्षेत्रासाठी पर्जन्य कर वेगवेगळा असेल. मिळालेल्या माहितीनुसार, जिथे जास्त इमारती आहेत, तिथे ओलावा जास्त असेल, त्यामुळे पावसाचा करही जास्त असेल. यामध्ये घरे, वाहनतळ आणि काँक्रीटपासून बनवलेल्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कमी इमारती आहेत तेथेही कर कमी होईल.

सर्वसामान्यांच्या अडचणी कशा वाढणार?

कॅनडामधील लोकांवर वैयक्तिक कर खूप जास्त आहेत. फायनान्शिअल पोस्टच्या अहवालानुसार, कॅनडा जगातील सर्वाधिक वैयक्तिक कर लादलेल्या देशांच्या श्रेणीमध्ये येतो. त्यामुळे पावसाच्या करामुळे लोकांचा त्रास वाढू शकतो. याशिवाय जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांच्यावर कर आकारला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा