बेळगाव-गोवा रस्त्याच्या दुरुस्तीस पुन्हा प्रारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 11:07 pm
बेळगाव-गोवा रस्त्याच्या दुरुस्तीस पुन्हा प्रारंभ

बेळगाव : कर्नाटक आणि गोव्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून बेळगाव-गोवा एनएच ७४८ ए. ए. या चोर्ला मार्गे रस्त्याच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर गुरुवारी पुन्हा सुरू झाले.

कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी या कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने केवळ एक आठवडा हे काम केले, तेव्हापासून हे काम बंद होते.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक वाढली आहे, तथापि, काही खराब झालेले पॅच दुरुस्त केल्यानंतर, काम अचानक थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले.

पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कामगार होळीच्या सुट्टीसाठी गेले होते. गुरुवारपासून हे काम पुन्हा सुरू झाले आहे. तीन आठवड्यांहून अधिक काळानंतर जांबोटीजवळील मोठमोठे खड्डे दुरुस्त करण्याचे काम सुरू असलेले दिसले.

कर्नाटक पीडब्ल्यूडीने २४ फेब्रुवारीपासून ४३.३५ किलोमीटरची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी केली आहे, यासाठी एनएचएआयने ५९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सर्व खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. पीडब्ल्यूडी गुणवत्तेवर लक्ष ठेवणार असल्याचे नॅशनल हायवे अॅथॉरेटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक भुवनेश कुमार यांनी सांगितले.

या आठवड्याच्या सुरुवातीला रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्याची बातमी ऐकून मी माझ्या वृद्ध आईसोबत बेळगावला जात होतो, तथापि, मला या मार्गावरुन जाण्याचा पश्चाताप झाला. रस्त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. माझ्या वृद्ध आईला या मार्गावरून प्रवास करताना त्रास झाला, परत येताना मी तिलारीचा मार्ग स्वीकारला, असे सेवारत जेरियाटिक केअरच्या रोहिणी गोन्साल्विस यांनी सांगितले.