तेलंगणा पोलिसांनी गोव्यातील पोलिसांना अंधारात ठेवून एका डीजेला केली अटक!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th March, 12:56 pm
तेलंगणा पोलिसांनी गोव्यातील पोलिसांना अंधारात ठेवून एका डीजेला केली अटक!

म्हापसा : शिवोली येथे व्यवसाय करणार्‍या एका डीजेला ड्रग्स तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी उत्तर गोव्यातील किनारपट्टीतून अटक करून नेले आहे. गोवा पोलिसांना माहिती न देताच तेलंगणा पोलिसांनी त्याला उचलून नेले आहे. या घटनेनंतर डीजेच्या मैत्रिणीने पोलिसांत त्याच्या अपहरणाची तक्रार दिली आहे. हा डीजे मूळ दक्षिण भारतीय आहे.

चार दिवसांपूर्वी उत्तर गोव्यातील किनारी भागात पोलीस असल्याचे सांगून चार जणांनी या डीजेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्या डीजेच्या मैत्रिणीने जवळील पोलीस स्थानकात संपर्क साधला. तिथे चार जणांनी मित्राला पकडून नेल्याचे सांगितले. पण, गोवा पोलिसांनी त्याला पकडले नव्हते. त्यामुळे तिने मित्राचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला असता, त्या डीजेला तेलंगणा पोलिसांनी पकडून नेल्याचे आढळून आले. त्याच्यावर तेलंगणा मध्ये ड्रग्स तस्करीचा गुन्हा नोंद असल्याचेही पोलिसांना समजले. ही माहिती नंतर गोवा पोलिसांनी तक्रारदार महिलेला दिली आहे.

दरम्यान, २०२३ मध्ये बार्देशमधील काही सराफी लोकांनी कोल्हापूर (महाराष्ट्र) पोलिसांनी चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या आरोपाखाली पकडून नेले होते. महाराष्ट्र पोलिसांनी याची स्थानिक पोलिसांना कल्पना दिली नव्हती. या अटकेच्या कारवाईचा म्हापसा तसेच राज्यभरातील सुवर्णलंकार व्यावसायिकांनी निषेध करण आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी यापुढे रात्रीच्या वेळी राज्यातील सुवर्णलंकार किंवा इतर संशयितांना परराज्यातील पोलिसांमार्फत अटक करू दिली जाणार नाही, असे आश्वासन सुवर्णलंकार संघटनांना पोलीस महासंचालकांनी दिले होते. तसेच एखाद्या व्यक्तीला गोव्यातून अटक करायची असल्यास त्याची कल्पना संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांना द्यावी, असे निर्देशही परराज्यातील पोलिसांना यावेळी गोवा पोलीस महासंचालकांनी दिले होते. पण, वरील अटकेच्या कारवाईमध्ये तेलंगणा पोलिसांनी गोवा पोलीस महासंचालकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे.  

दरम्यान, गेल्या ऑगस्ट २०२२ मध्ये गोवा ते तेलंगणा ड्रग्ज तस्करी प्रकरणी ऑगस्ट २०२२ मध्ये हैदराबाद, तेलंगणा पोलीसांनी एकूण १७४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यात गोव्यातील स्टीव्ह उर्फ जॉन स्टीफन डिसोझा, एडविन नुनीस, मंजूर अहमद, तुकाराम साळगावकर, विकास नाईक, रमेश चव्हाण यांचा समावेश होता. त्यावेळी या प्रकरणातील प्रीतेश बोरकर याला हैदराबाद नार्कोटिक सक्तवसुली विभाग व ओस्मानिया युनिवर्सिटी पोलिसांनी अशाचप्रकारे अटक केली होती.

हेही वाचा