सिंधु संस्कृतीचा विनाश महाविक्राळ उल्कापींडामुळे?

गुजरातमध्ये विवरात सापडला नवीन पुरावा

Story: डॉ. नंदकुमार कामत |
28th March, 09:40 am
सिंधु संस्कृतीचा विनाश महाविक्राळ उल्कापींडामुळे?

पणजी : गेल्या ५०००० वर्षांत प्रथमच पृथ्वीवर धडकलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडामुळे भारतात  गुजरातमध्ये सापडलेले संभाव्य विवर ४००० वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचे कॅनडातील शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे. पण डिसेंबर २०२३ मध्ये  केरळ विद्यापीठाच्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी हे विवर ६९०० वर्षांपूर्वी  उल्का कोसळुन तयार झाल्याचा  दावा केला होता. 

ह्या पथकाचे प्रमुख साजीनकुमार ह्यांच्या मते हा उल्कापिंड १०० ते २०० मीटर्स रुंदीचा असावा.‌ तो कोसळल्यावर तयार झालेल्या दोन -किलोमीटर रुंदीच्या ह्या विवराला,  लूना स्ट्रक्चर म्हणतात. २००४ पासुन करंथ, गाडवी  इत्यादी शास्त्रज्ञांनी  कच्छच्या मोठ्या रणातील  ह्या अद्भुत विवराकडे जगाचे लक्ष वेधले होते व वैदीक साहित्यात ४५०० वर्षांपूर्वी आकाशातुन कोसळलेल्या अशाच संकटाचा  उल्लेख मिळत असल्याचे जाहीर केले होते.‌ ह्या वैदीक उल्लेखाला आता नवीन संशोधनामुळे पुष्टी मिळाली आहे. 

 गुजरात राज्यातील स्थानिकांना काही काळापासून त्याची माहिती आहे.  परंतु आता सखोल भू-रासायनिक विश्लेषणाने विवरातील नमुने तपासुन ह्या उल्कापिंडांचे वैशिष्ट्य शास्त्रज्ञांनी उघड केले आहे. हा उल्कापिंड ,एक प्रचंड आगीचा गोळा आकाशातुन कोसळताना एक प्रचंड शॉक वेव्ह  वातावरणात तयार  झाली होती आणि हजारो वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतील लोकांची वस्ती असलेल्या भागात त्यामुळे महाभयंकर वणव्याची आग पसरली असावी व त्यात सिंधु संस्कृतीची विवरानजीकची व जवळची केंद्रे नष्ट झाली असावीत असे  कॅनडामधील वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील गॉर्डन ओसिन्स्की ह्यांचं नवीन संशोधन आहे.‌

 सिंधु संस्कृतीतील मुख्य ठिकाणे ह्या विवरापासुन २०० किमी परीघात सामावतात पण खरोखरीच ४०००  वर्षांपूर्वी ही अशा महाभयंकर आपत्तीत नष्ट झाली असावीत ह्यावर कुणाचा विश्वास नव्हता. पण आता ह्या नवीन संशोधनामुळे खळबळ माजली आहे. कारण पुर्व इराण,  दक्षिण अफगाणिस्तान वर‌ प्रभाव टाकणारी व आजचे संपूर्ण पाकिस्तान, राजस्थान, गुजरात, मराठवाडा, पंजाब, हरयाना, उत्तर प्रदेश अशा १३ लाख चौरस किमी क्षेत्रातील सिंधु सरस्वती संस्कृती संबंधित बरेचसे जुने निष्कर्ष आता मोडीत काढावे लागतील, असे डॉ. नंदकुमार कामत यांनी सांगितले. 

हेही वाचा