काँग्रेसचे उमेदवार आज किंवा उद्या होणार जाहीर

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत नावांवर चर्चा


28th March, 12:14 am
काँग्रेसचे उमेदवार आज किंवा उद्या होणार जाहीर

दिल्लीतील बैठकीला उपस्थित गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीतील गोव्याचे उमेदवार निश्चित करण्यासाठी बुधवारी दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असून, गुरुवार किंवा शुक्रवारी अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर य‍ांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना याबाबतची माहिती दिली. दिल्लीतील बुधवारच्या बैठकीला ठाकरे, पाटकर य‍ांच्यासह विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसने उत्तर गोव्यासाठी माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप अ‍ाणि सरचिटणीस विजय भिके यांची, तर दक्षिण गोव्यासाठी ख‍ासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर अ‍ाणि सरचिटणीस विरियातो फर्नांडिस य‍ांची नावे दिल्लीत पाठवली होती. बुधवारच्या बैठकीत त्याच नाव‍ांवर चर्चा झाल्याचेही य‍ा दोन्ही नेत्य‍‍ांनी सांगितले.
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सत्ताधारी भाजप आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या पक्षांनी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून प्रचारासही प्रारंभ केला. तरीही काँग्रेसने अद्याप दोन्हीही मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केलेेले नाहीत. बुधवारच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊन उमेदवार जाहीर होतील, अशी आशा सर्वांनाच होती. पण, अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करण्यास केंद्रीय निवडणूक समितीने अ‍ाणखी दोन दिवस घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांतही संभ्रम निर्माण झाला आहे.
नव्या चेहऱ्यांची अधिक शक्यता
बुधवारच्या बैठकीत प्रदेश काँग्रेसने दिलेल्या नावांवर चर्चा झाली असली, तरी काँग्रेस यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची अधिक शक्यता आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी अंतिम उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल. पण, ते काँग्रेसचेच असतील असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केल्यामुळे पक्षासाठी प्रामाणिक असलेल्यांना यावेळी संधी मिळेल, हे निश्चित झाले आहे.            

हेही वाचा