तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अखेर प. बंगाल पोलिसांकडून अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th February, 09:50 am
तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अखेर प. बंगाल पोलिसांकडून अटक

कोलकाता : पं. बंगालसह संपूर्ण देशभरात खळबळ माजवणारा संदेशखळीतील तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अखेर पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तररात्री ३ वाजता अटक केली. ५ जानेवारी २०२४ रोजीपासून तो फरार होता. त्याच्यावर स्थानिक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर संदेशखळीपासून दिल्लीपर्यंत हलकल्लोळ माजला होता. अखेर ५५ दिवसांनी तो पोलिसांच्या हाती लागला.

प. बंगालमधील रेशन धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाचे (ED) पथक ५ जानेवारी रोजी शेख याच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी शेखच्या समर्थकांनी पथकावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्या गाड्या फोडल्या होता. तसेच पथकातील अधिकाऱ्याला जखमी केले होते. त्याचवेळी संधी साधून शेखने पलायन केले होते. तो फरार झाल्यानंतर संदेशखळीतील मागास जमातीतील लोकांनी धाडस करून त्याने जमिनीही बळजबरी हडप केल्याचा आरोप केला. त्यानंतर चार दिवसांत तेथील महिलांनीही धाडस करून त्यांनी भोगलेल्या नरकयातना जगासमोर मांडल्या. हे घडल्यानंतर त्याच पंधरा दिवसांत अनेक महिलांवर बलात्कार आणि क्रूर हत्या झाल्याचे समोर आले. या घटनेचे पडसात दिल्लीपर्यंत उमटले. राजकीय वर्तृळात खळबळ माजली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन कोलकाता उच्च न्यायालयाला महत्त्वाचे निर्देश दिले होते. उच्च न्यायालयाने शाहजहान शेख याच्यावर आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर कडक ताशेरे ओढत शेखला शरण येण्याचा आदेश दिला होता. मात्र, तो शरण आला नाही. त्यानंतर दोन वेळा उच्च न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊन त्याला अटक करण्यास सांगितले होते. त्याला आज मिनाखान येथील अज्ञात ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.

शाहजहान शेख डा उत्तर 24 परगणा जिल्हा परिषदेचा मत्स्यव्यवसाय आणि प्राणी संसाधन अधिकारी आणि संदेशखळी तृणमूल काँग्रेस पक्षाचा ब्लॉक अध्यक्ष आहे. तो ममता सरकारमधील वनमंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांच्या जवळचा आहे.

मिनाखानचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिनुल इस्लाम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजहानला पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर २४ परगणा येथील मिनाखान भागातून अटक केली असून त्याला बशीरहाट न्यायालयात नेण्यात आले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी निर्देश होते. त्यात पश्चिम बंगाल पोलिसांना शेख सापडत नसल्याचे पाहून सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील शाहजहान शेखला अटक करू शकतात, असे स्पष्ट केले होते. मात्र, या आदेशानंतर अवघ्या दोनच दिवसांत तो प. बंगाल पोलिसांच्या हाती सापडला.

तीन खुनांचा आरोप, आरोपपत्रात नाव नाही

शाहजहान शेख याच्यावर तीन खुनांचा आरोप आहे. एफआयआरमध्ये नाव आहे पण आरोपपत्रात आरोपी नाही. ८ जून २०१९ रोजी देवदास मंडळाचे अपहरण झाले. त्याच्या पत्नीने दुसऱ्या दिवशी अपहरणाचा एफआयआर दाखल केला. नंतर एक मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला. हा मृतदेह देवदास मंडळाचा असल्याचे डीएनए प्रोफाइलिंगवरून आढळून आले. या प्रकरणातील आरोपी शेख शहाजहान व त्याचे साथीदार आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात शेख शाहजहानला आरोपी बनवण्यात आले नाही आणि ज्यांची नावे एफआयआरमध्ये नव्हती त्यांना आरोपी करण्यात आले.

हेही वाचा