होंडा येथे गादी कारखाना आगीत खाक

रुतुटेक कंपनीच्या गोदामातील लाखोंची मालमत्ता भक्ष्यस्थानी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th February, 11:15 pm
होंडा येथे गादी कारखाना आगीत खाक

वाळपई : होंडा औद्योगिक वसाहतीत असलेल्या रुतुटेक एंटरप्रायझेस या कुशन गादी, उशी तयार करणाऱ्या एका कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

औद्योगिक वसाहतीमधील गाद्या तयार करण्याच्या कारखान्याला अचानकपणे आग लागली. घटना ६ वा. सुमारास घडली. याची माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. गोदामाला आग लागली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपडे भरले होते. आग कशी लागली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न स्थानिक कामगारांनी केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. शेवटी वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.

दरम्यान, रात्री ८ वा. सुमारास आग नियंत्रणात आली. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात गोदामातील माल जळून भस्मसात झाला होता. या गोदामात कपडे भरल्यामुळे आगीने आक्रमक रूप धारण केले. जेसीबीचा वापर करून गोदामातील कपडे अस्ताव्यस्त करण्यात आल्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली.

वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास काही प्रमाणात आग विझलेली असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगीची दोन कारखान्यांना झळ

आगीची झळ दोन्ही बाजूने असलेल्या कारखान्यांना बसली. सदर कारखान्यांमधील काही सामान जळाले. या कारखान्यांमध्ये पाण्याचा फवारा मारून आगीची झळ कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.