कर्तव्याचे पालन करताना पोलिसांनी खाकीची शान राखावी!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : २९९ पोलीस सरकारच्या सेवेत दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th February, 12:03 am
कर्तव्याचे पालन करताना पोलिसांनी खाकीची शान राखावी!

वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये परेडची पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत.

वाळपई : पोलीस हे समाजाचे रक्षक आहेत. त्यांनी समाजाचे कान व डोळे बनावेत. समाजाचे रक्षण करावे. समाजामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टीवर लक्ष ठेवावे. आपल्या हातून कोणत्याही प्रकारची चूक घडणार नाही, याची विशेष दखल घ्यावी. आपल्या कुटुंबाला अपमान सहन करावा लागणार, अशा कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्यामध्ये आपण सापडणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. शांती, सेवा व आरोग्य हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. त्याचे जतन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत यांनी केले.
वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते. २९९ पोलीस कर्मचारी रविवारपासून सरकारच्या सेवेमध्ये दाखल झाले. यामध्ये १७५ पुरुष तर १२४ महिलांचा समावेश आहे. वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर सदर दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पोलिसांची खाकी वर्दी प्राप्त केल्यानंतर या वर्दीची शान राखा. या वर्दीवर कोणत्याही प्रकारचे बदनामीचे आरोप होणार नाहीत, याची विशेष दखल घ्या. अन्यथा त्याचे प्रतिकूल परिणाम पोलीस खात्याच्या प्रतिमेवर होणार. यामुळे प्रत्येकाने प्रशिक्षणाच्या कार्यकाळामध्ये शिकविण्यात आलेल्या सर्व घटकांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असे अावाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. विद्यालयाच्या प्राचार्य सुचिता देसाई यांनी प्रशिक्षणार्थींना कर्तव्याची शपथ दिली.
अनेक प्रशिक्षणार्थींना पुरस्कार
९ महिन्याच्या प्रशिक्षणात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी संजय वरक, ऐश्वर्या नाईक, ऋषिकेश शेट, सौरभ नाईक, केदार च्यारी व आत्माराम पोते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.