सिक्वेरांना आज खाते वाटप शक्य

‘पीडब्ल्यूडी’साठी दोन मंत्री प्रयत्नशील

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st November, 05:04 am
सिक्वेरांना आज खाते वाटप शक्य

पणजी : आलेक्स सिक्वेरा यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशानंतर मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होणार आहेत. परंतु, विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, ​बाबूश मोन्सेरात आणि रोहन खंवटे या चार मंत्र्यांकडे अतिमहत्त्वाची खाती असल्यामुळे खात्यांत बदल करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.             

नूतन मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे तूर्तास कोणत्याच खात्याची जबाबदारी दिलेली नाही. त्यांच्याकडे पर्यावरण, कॅप्टन ऑफ पोर्टस व कायदा ही खाती देण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी चालवला आहे. काब्राल यांना हटवल्यामुळे दोन मंत्र्यांनी ‘पीडब्ल्यूडी’वर डोळा ठेवला आहे, तर अतिमहत्त्वाची खाती चार मंत्र्यांकडेच असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणाची खाती काढायची, असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपसमोर उभा राहू शकतो.     

चार मंत्र्यांकडे अतिमहत्त्वाची खाती असल्यावरून यापूर्वीही इतर मंत्र्यांमधील धुसफूस समोर आली आहे. त्यामुळे आता खात्यांमध्ये बदल झाले, तर आपल्या पदरात चांगली खाती पडतील, असा विश्वासही काही मंत्र्यांना वाटत आहे. परंतु, हा बदल करताना मुख्यमंत्री आणि पक्षासमोर मात्र अनेक गोष्टींचा पेच राहणार असून, काहींची निराशाही सहन करावी लागू शकते. 

तेलंगणला जाण्याआधीच निर्णय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंगळवारपासून पुढील दोन दिवस तेलंगणच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते तिकडे रवाना होण्यापूर्वी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो. अन्यथा ते तेलंगणमधून गोव्यात आल्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.            

मंत्रिमंडळात मूळ भाजपचे केवळ दोघेच   

नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून हटवल्यामुळे मंत्रिमंडळात आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सुभाष फळदेसाई हे दोघेच मंत्री मूळ भाजपचे राहिलेले आहेत. उर्वरित दहा मंत्री इतर पक्षांतून आयात केलेले आहेत.

हेही वाचा