उमेदवारांमध्ये नाराजी : फेरपरीक्षा घेतली जाण्याची शक्यता
पणजी : सरकारच्या बऱ्याच खात्यांमधील नोकर भरती प्रलंबित असल्याने परीक्षा दिलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जलस्राेत खात्यातील १९० जागांसाठी जाहिरात देऊन परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तरी अद्याप नोकर भरती झालेली नाही. परीक्षेचा निकाल ६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर झाला. त्यानंतर दीड वर्ष उलटूनही नोकर भरतीविषयी कसल्याच हालचाली झालेल्या नाहीत.
सरकारच्या सर्व खात्यांमध्ये नोकर भरती प्रलंबित आहे. वीज खात्यामध्ये लाईनमन भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु सरकारने भरतीला मान्यता दिलेली नाही. नोकर भरतीची मुदत सरकारने तीन महिन्यांनी वाढवली आहे. या विषयीचा अध्यादेश जारी झाल्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये आशा निर्माण झाली आहे. सरकारकडून नोकर भरतीविषयी पत्र किंवा जाहिरात येणार म्हणून ते वाट पाहात आहेत. सुपरवायझर, पंप अटेंडन्ट, मेकॅनिक या पदांसाठी निवडणुकीपूर्वी जाहिरात जारी होऊन परीक्षाही झाली, परंतु सरकारने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. या पदांसाठी फेरपरीक्षा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जलस्राेत खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जलस्राेत खात्यात १९० कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी २१ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात सुपरवायझर १५२, पंप अटेंडन्ट ६, असिस्टंट ऑपेरेटर १७, मेकॅनिक २, वर्क असिस्टंट १० आणि इलेक्ट्रिशियन्सच्या ३ पदांचा समावेश होता. या पदांसाठी एक हजारहून अधिक तरुणांनी अर्ज केले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर ४ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत परीक्षा झाली. ६ जानेवारी २०२२ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यासंदर्भातील जाहिरातीला दोन वर्षे पूर्ण झाली. परीक्षेच्या निकालाला येत्या जानेवारीत दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. परंतु नोकर भरतीविषयी मात्र कसल्याच हालचाली झालेल्या नाहीत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण माहीत आहेत. पुढे काय झाले किंवा काय होणार, हे मात्र कोणीच सांगत नाहीत. यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. परीक्षा दिलेले उमेदवार स्थानिक आमदार तसेच मंत्र्यांकडे चौकशी करत आहेत, परंतु त्यांना समाधानकारक असे उत्तर कोणीच देत नाही.
फेरपरीक्षा होण्याची शक्यता : मुख्य अभियंता
जलस्राेत खात्याच्या नोकर भरतीची परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यावर एक वर्ष उलटले आहे. या संदर्भातील फाईल सरकारकडे आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तरी फेरपरीक्षा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जलस्राेत खात्याचे मुख्य अभियंते पी. बी. बदामी यानी दिली.