फोंड्यात डेंग्यूचा उद्रेक

सप्टेंबर महिन्यात २५ संशयास्पद रुग्ण : प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September, 11:44 pm
फोंड्यात डेंग्यूचा उद्रेक

फोंडा : तालुक्यात सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे शिरोड्यात ७, फोंडा व मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी ९ संशयास्पद रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाल्याने डेंग्यूच्या संशयास्पद रुग्णांची संख्या वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यूचे ६ संशयास्पद रुग्ण आढळले, तर एका रुग्णाला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मडकई व फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी ९ डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण आढळले असून सर्व ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे. काही ठिकाणी जागृती करण्याबरोबरच औषधाची फवारणी करण्यात आली आहे. कित्येक संशयास्पद रुग्ण वास्को व वेर्णा परिसरात काम करत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, स्वच्छता विभागाचे निरीक्षक व अन्य कर्मचारी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.