शेकडो वर्षांपासून केले जाते गणपती चित्राचे पूजन

पणजीतील प्रभू वेर्लेकर कुटुंबियांनी जपली परंपरा : विसर्जन मात्र प्रतीकात्मक पद्धतीने

Story: पिनाक कल्लोळी |
18th September, 11:18 pm
शेकडो वर्षांपासून केले जाते गणपती चित्राचे पूजन

प्रभू वेर्लेकर कुटुंबात पुजले जाणारे श्री गणपतीचे चित्र.

गोवन वार्ता

पणजी : राज्यात गणरायांचे आगमन उत्साहात झाले. बहुतेक ठिकाणी पारंपरिक गणेशमूर्तींचे पूजन केले जाते. मात्र काही मोजक्या कुटुंबात गणेश चतुर्थीला गणपतीच्या चित्राचे पूजन केले जाते. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे. पणजी येथील व्ही. बी. प्रभू वेर्लेकर यांच्या कुटुंबातही ही परंपरा जोपासली जाते.      

पोर्तुगीज काळात श्री गणेशाच्या मूर्ती पुजनावर बंदी घालण्यात आली होती.  मूर्ती पूजन केल्यास शिक्षा होत असे. त्यामुळे काही कुटुंबियांनी घरातच गणपतीचे चित्र काढून त्याची पूजा करणे सुरू केले. या चित्राचे विसर्जन प्रातिनिधिक स्वरूपात घरातच केले जात असे. यामुळे पोर्तुगीजांना गणेशमूर्तीचे पूजन होते याची माहितीच मिळत नव्हती. पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त झाल्यानंतरही काही कुटुंबियांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.      

चतुर्थीच्या काळात प्रभू वेर्लेकर यांच्या कुटुंबात गणपती, महादेव आणि पार्वतीच्या चित्रांचे पूजन केले जाते. चतुर्थीला कुटुंबातील ३५ ते ४० सदस्य जमा होतात. गणपतीच्या चित्राची पूजा होत असली तर इतर विधी हे श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीला केले जातात तसेच केले जातात. माटोळ्यांची सजावटही करण्यात येते. चित्रातील गणपतीलाच नैवद्य दाखवला जातो.       

प्रभू वेर्लेकर कुटुंबीय चतुर्थीला दरवर्षी नवीन चित्रे पूजतात. ही चित्रे वेरे येथून आणली जातात. दीड दिवसांचा गणपती झाल्यावर विसर्जन मात्र प्रतीकात्मक पद्धतीने केले जाते. फ्रेममधील चित्रे पाण्यात न सोडता ती काळजीपूर्वक बाजूला काढून ठेवण्यात येतात. ही फ्रेमही शेकडो वर्षे जुनी आहे.       

आमच्या कुटुंबातील गणपती चित्राच्या पूजनाची परंपरा पोर्तुगीज काळापासून चालत आली आहे. सध्या काही घरांतच अशा पद्धतीची पूजा होते. पूर्वी आमचे आजोबच गणेश, पार्वती आणि महादेवाची चित्रे काढत होते. 
—  व्ही. बी. प्रभू वेर्लेकर, गणेशभक्त, पणजी 

हेही वाचा