थिवी फुटबॉल मैदानावरून ग्रामसभेत जोरदार चर्चा

विश्वासात घेऊनच मैदानाचे काम करू; सरपंचांचे ग्रामस्थांना आश्वासन


29th May 2023, 12:33 am
थिवी फुटबॉल मैदानावरून ग्रामसभेत जोरदार चर्चा

ग्रामसभेत बोलताना थिवीचे सरपंच अर्जुन आरोसकर. (आग्नेल परेरा)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा : थिवी फुटबॉल मैदानाचा विकास करण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. पंचायतीने आधी मैदानाची दुरुस्ती करून नंतर जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन पार्क, ड्रेनेज आदी कामे करावीत, अशी मागणी रविवारच्या ग्रामसभेत करण्यात आली.

माजी सरपंच रॉबर्ट कुलासो यांनी फुटबॉल मैदानाच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला. ग्रामपंचायतीने मैदानाचा विकास करण्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीने प्रथम मैदानाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि त्यानंतर जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन पार्क आदी कामांवर लक्ष केंद्रित करावे. सरपंचांनी समितीला विश्वासात न घेता फुटबॉल मैदानासंबंधी काही निर्णय घेतले आहेत. गावातील कामे करताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घ्या. सरकारी पैसा वाया घालवू नका, अशी मागणी कुलासो यांनी केली.

सरपंच अर्जुन आरोसकर यांनी फुटबॉल मैदान विकसित करण्याची प्रलंबित मागणी पूर्ण करताना गावातील सर्व लोकांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिले. गावात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून त्यातील काही निविदा निघाल्या आहेत, तर काही आर्थिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, असे सांगितले.

सरपंच आरोसकर यांचे आश्वासन

ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही प्रथम मैदानाचे काम करू आणि त्यानंतर जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन पार्कचे काम हाती घेऊ, असे सरपंच अर्जुन आरोसकर यांनी सांगितले. फुटबॉल मैदानाचा विकास ‘आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा’ योजनेंतर्गत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.