‘वाईल्डलाईफ सफारी पार्क’साठी वन खाते प्रयत्नशील

वन मंत्री राणेंचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयास प्रस्ताव


28th May 2023, 12:31 am
‘वाईल्डलाईफ सफारी पार्क’साठी वन खाते प्रयत्नशील

(संग्रहित)

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राज्यातील नेत्रावळी किंवा मोले अभयारण्यात ‘वाईल्डलाईफ सफारी पार्क’ सुरू करण्यासाठी आपण केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राज्यातील पर्यटन उद्योगाला फायदा होईल. शिवाय अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळेल, असा विश्वास वनमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केलेली असून, नेत्रावळी किंवा मोले अभयारण्यात ‘वाईल्डलाईफ सफारी पार्क’ सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. राज्यातील जंगले आणि वन्यप्राण्यांचे संरक्षण करून पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी वन खात्याचे अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत, असे मंत्री राणे यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे.

गोवा पर्यटन राज्य असल्याने दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक गोव्याला भेट देत असतात. हजारो पर्यटक दरवर्षी बोंडला प्राणी संग्रहालयाला भेटही देत असतात. अनेक पर्यटकांना जंगली प्राण्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी ‘वाईल्डलाईफ सफारी पार्क’मध्ये जाण्याची इच्छा असते. परंतु, गोव्यात अभयारण्ये असतानाही असे पार्क नसल्यामुळे पर्यटकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. नेत्रावळी किंवा मोले अभयारण्यात ‘वाईल्डलाईफ सफारी पार्क’ सुरू केल्यास देशी-विदेशी पर्यटकांचा त्याकडे ओढा वाढून जंगल पर्यटनाला आणखी चालना मिळेल. तसेच यातून राज्याच्या तिजोरीत अधिकाधिक महसूलही जमा होईल, या हेतूनेच वन खात्याने ‘वाईल्डलाईफ सफारी पार्क’ सुरू करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू केलेले आहेत.

अस्वलांसह इतर प्राणी बोंडलात होणार दाखल

अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील अभयारण्ये तसेच बोंडला प्राणी संग्रहालयामध्ये अत्याधुनिक साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा मास्टरप्लॅन तयार करून त्यानुसार बोंडला प्राणी संग्रहालयात वन खात्याने कामही सुरू केलेले आहे. पुढील काही दिवसांत तेथे अस्वलांची जोडी तसेच इतर प्राणीही दाखल होणार आहेत.