एकाचे जागीच, तर एकाचे हॉस्पिटलमध्ये नेत असताना निधन
कोठार्ली सांगे येथील अपघाताचा पंचनामा करताना पोलीस. (संदीप मापारी)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
सांगे : कोठार्ली सांगे येथे रविवारी दुपारी २.३० वा. पेप्सी कंपनीच्या ट्रकच्या चाकाखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला. एकाचा जागेवरच, तर दुसऱ्याचे हॉस्पिटलमध्ये नेत असताना निधन झाले. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
रविवारी दुपारी २.३० वा. मंजोत च्यारी (३४) हा परप्रांतीय मजुराला घेऊन दुचाकीवरून कोठार्ली-दाबामळ रस्त्याने निघाला होता. पेप्सी कंपनीत गॅस घेऊन निघालेल्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मंजोतचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेला कामगार गंभीर जखमी झाला. ट्रकही रस्त्याशेजारी जाऊन कलंडला. अपघातानंतर ट्रकचा चालक तेथून पळून गेला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या मजुराचा हाॅस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अवजड वाहतूक बंद करण्याबाबत निर्णय होत नाही, तोवर मंजोतचा मृतदेह स्वीकारायचा नाही, असे ठरवले होते. पेप्सी कंपनीच्या प्रोडक्शन मॅनेजरने ग्रामस्थांची समजूत काढली. मंगळवारी सकाळी ८ वा. कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांची बैठक घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास मंजोतचा मृतदेह स्वीकारण्यात आला.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी मंजोतचा भाऊ लवलेश याचाही याच रस्त्यावर पेप्सी कंपनीच्या ट्रकखाली सापडूनच मृत्यू झाला होता. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पेप्सी कंपनीच अन्यत्र हालवण्याची मागणी केली होती. मात्र कोणाच्या तरी आशीर्वादाने ही कंपनी येथेच राहिली. त्याच कंपनीच्या ट्रकखाली लवलेशच्या भावाचा तसाच मृत्यू झाला. याबद्दल ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे.
अवजड वाहतुकीवर उपाय निघाला असता तर...
अपघाताची अशीच घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती. त्या अपघातात मंजोत च्यारीचा भाऊ लवलेश यांचा ट्रकच्या चाकांखाली सापडून मृत्यू झाला होता. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी अवजड वाहतूक या रस्त्यावरून न करण्याची मागणी केली होती. तसेच अपघातात मृत्यू झालेल्या लवलेशच्या कुटुंबियांना साहाय्य करावे, रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणीही केली होती. परंतु पेप्सी कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच रस्त्यावर तशाच प्रकारचा अपघात झाला आणि दोघांना प्राणाला मुकावे लागले. याबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.