गोव्याला आयटी क्षेत्रात बनविणार अग्रेसर

मुख्यमंत्री डाॅ. सावंत : नोकरीसाठी युवकांचे स्थलांतर रोखणे गरजेचे


02nd December 2022, 12:44 am
गोव्याला आयटी क्षेत्रात बनविणार अग्रेसर

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : सरकार गोव्याला भविष्यात आयटी क्षेत्रात अग्रेसर राजधानी बनविण्याचा प्रयत्न करत असून या योजनांचा लाभ गोमंतकीयांना घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आयटी आणि स्टार्टअप योजनेच्या लाभार्थींना गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत शेटये यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आले.

राज्यात आयटी क्षेत्राला उभारणी दिली जात आहे. राज्यातील युवक संधी मिळत नसल्याने बाहेर राज्यात नोकरीसाठी जातात, असे प्रकार भविष्यात होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळेच राज्य सरकार स्टार्टअप आणि आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध योजनांमार्फत सहकार्य करते. यासाठी युवकांना प्रोत्साहन दिले जात आहे. आयटी खात्यामार्फत विविध उपक्रमही राबविले जात आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. आयटी योजनेचाही लाभ घेण्यात आला असून या योजनेंतर्गत एकूण १५ कंपन्यांना प्रमाणित करण्यात आले आहे, तर ४ कंपन्यांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत जवळपास ८५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर ३९.३४ लाख रुपये दिले आहेत, असेही मंत्री राहन खंवटे म्हणाले.

३.२८ कोटी रुपये स्टार्टअप योजनेत मंजूर

२०१५ पर्यंत गोवा राज्य हे आम्हाला स्टार्टअप डेस्टिनेशन करायचे आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आजपर्यंत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने १६४ स्टार्टअप्सना प्रमाणित केले आहेत, तर यातील ५१ स्टार्टअप्सन त्याचा लाभ झाला आहे. एकूण ३.२८ कोटी रुपये स्टार्टअप योजनेत मंजूर करण्यात आले आहेत. तर २.४५ कोटी रुपये आजपर्यंत देण्यात आले आहेत, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.