कलाकार अर्थसहाय्य निधी विधानसभा निवडणुकीचा फंडा!

राज्यातील कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया; विश्वासघात केल्याची भावना

Story: जयंती दहिफोडे |
14th August 2022, 12:10 am
कलाकार अर्थसहाय्य निधी विधानसभा निवडणुकीचा फंडा!

पणजी : कोविड काळात बिकट आर्थिक संकटात सापडलेल्या कलाकारांना प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याचे आश्वासन हे केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून दिलेले होते. कलाकारांना अर्थसहाय्याचे आश्वासन देऊन मंत्री गोविंद गावडे यांनी त्यांचा विश्वासघात केला आहे, अशा प्रतिक्रिया राज्यभरातील कलाकारांकडून व्यक्त होत आहेत.
राज्यात कोविडचा उद्रेक झाल्यामुळे मार्च २०२० पासून पुढील काही महिने राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहिले. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांत कला सादर करून पोट भरणाऱ्या राज्यातील ह​जारो कलाकार आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले होते. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रत्येक कलाकाराला पाच ते दहा हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य करण्याची घोषणा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी जुलै २०२१ मध्ये केली होती. परंतु, आता ही घोषणा बासनात गुंडाळल्यात जमा आहे. याबाबतचे वृत्त ‘गोवन वार्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभरातील कलाकारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत ‘गोवन वार्ता'शी बोलताना कलाकार प्रीतेश पाटील म्हणाले, कोविड काळात कलाकारांचे जगणे कठीण झाले होते. त्यामुळेच मंत्री गावडे यांनी त्यांना मदतीचा हात म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची योजना आखली होती. परंतु, या घोषणेस वर्ष उलटून गेले तरी कलाकारांना ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे कलाकारांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. केवळ विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच त्यांनी ही घोषणा केल्याचा संशय बळावला आहे, असे ते म्हणाले.
नीतेश नाईक म्हणाले, कोविड काळात सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाल्याने कलाकारांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु, गेली २० ते २५ वर्षे कलाकार म्हणून काम करीत गोव्यातील पारंपरिक कला अबाधित राखणाऱ्या कलाकारांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मंत्री गोविंद गावडे यांनी आश्वासन दिले. परंतु, नंतर त्याकडे कानाडोळा केल्यामुळे कलाकारांत त्यांच्याबाबत नाराजी पसरली आहे.
दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून सरकारने कलाकारांना खूश केले आणि विधानसभा निवडणुकीत त्यांची मते मिळवली. राज्यातील अनेक कलाकार आजही हलाखीत जीवन जगत आहेत. त्यांचा विचार करून कला आणि संस्कृती खात्याने तत्काळ ही योजना मार्गी लावून त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, असे अनंतदास नाईक म्हणाले.

गावडेंनी कलाकारांची मने दुखावली!

मंत्री गोविंद गावडे स्वत: कलाकार आहेत. ग्रामीण भागांतील कलाकारांचे प्रश्न, समस्यांची त्यांना जाणीव आहे. कलाकारांना आर्थिक बळकटी देऊन राज्यातील पारंपरिक कलांचे जतन करण्याचे कामही त्यांनी याआधी केले आहे. परंतु, या प्रकरणात मात्र त्यांनी कलाकारांची मने दुखावली आहेत. आता तरी त्यांनी खरोखरच आर्थिक संकटात असलेल्या कलाकारांचा विचार करून त्यांना मदत करावी, अशी मागणी इतर कलाकारांकडून होत आहे.

हेही वाचा