मालमत्ता हडपप्रकरणी अंजुम शेखला जामीन

|
06th August 2022, 01:12 Hrs
मालमत्ता हडपप्रकरणी अंजुम शेखला जामीन

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : हणजूण येथील मालमत्ता हडपप्रकरणी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या अंजुम शेख (४१) हिला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १ लाख रुपयाचा वैयक्तिक बाँड व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी खोर्ली (बार्देश) येथील जेनिफर कारास्को आणि सिसिनो कारास्को यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली होती. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची बनावट नोंदणी करून हणजूण येथील सर्व्हे क्र. ५०४/१० मधील भूखंड मेल्विन लोबो याने हडप केल्याचे म्हटले आहे. त्यासाठी लोबो यांनी आपण संबंधिताचे कायदेशीर वारस असल्याचे भासवून म्हापसा येथील नागरी व उपनिबंधक कार्यालयात आके-मडगाव येथील सलीम शेख याच्या नावे विक्रीपत्र नोंदणी केल्याचे समोर आले. या माहितीनुसार, तक्रारदाराने स्थानिक पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी ती एसआयटीकडे वर्ग केल्यानंतर संशयित मेल्विन लोबो आणि सलीम शेख यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एसआयटीच्या तपासात संबंधित भूखंड संशयित मोहम्मद सुहैल शफी याची पत्नी अंजुम शेख हिच्या नावावर केल्याचे समोर आले. त्यानंतर एसआयटीने अंजुम शेख हिला अटक केली होती. अटक करण्यात आल्यानंतर संशयित महिलेने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने तिला १ लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड, आठ दिवस एसआयटीत हजर राहण्याचा व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.