जमीन घोटाळा : मुख्य सूत्रधाराला अटक

विशेष तपास पथकाची कारवाई : मोहम्मद शफीला पाच दिवसांची कोठडी


23rd June 2022, 12:42 am
जमीन घोटाळा : मुख्य सूत्रधाराला अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी :       बोगस दस्तावेज तयार करून आसगाव (बार्देश) येथील जमीन हडप केल्याप्रकरणी  विक्रांत शेट्टी (रा. घोगळ - मडगाव) याला अटक केल्यानंतर गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी रात्री उशिरा मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल शफी (४५, रा. सांतिनेझ - पणजी, मूळ रा. चित्रदुर्ग - कर्नाटक) याला अटक केली आहे. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.                   

राज्य सरकारने जमिनी बळकावण्याच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. त्यानंतर पथकाने पणजी पोलीस स्थानकात दाखल गोंगुरे, आसगाव - बार्देश येथील एका व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊन पुराभिलेख खात्याचे माजी संचालक, जमीन बळकावल्याच्या कालावधीत बार्देशमध्ये असलेले तत्कालीन मामलेदार व बार्देशचे तत्कालीन सब रजिस्ट्रार यांच्यासह दुर्भाट-फोंडा येथील लुईझा फर्नांडिस, आयतानो फर्नांडिस, मीना रमाकांत नाईक व इतरांवर गुन्हा नोंदवला. या प्रकरणी भा. दं. सं.च्या ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, ४१९ व ४२० (१२० बी सह) खाली हा गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणी १८ रोजी पथकाने घोगळ मडगाव येथील विक्रांत शेट्टी याला अटक केली होती. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर एसआयटीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल शफी याला अटक केली आहे. शफी याच्याविरोधात २०१२ पासून जमीन हडप प्रकरणी म्हापसा, पर्वरी पोलीस स्थानक आणि आर्थिक गुन्हा विभाग (ईओसी) यांच्याकडे मिळून सहा गुन्हे दाखल झाली आहेत. यांतील एका गुन्ह्यात म्हापसा पोलिसांनी न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. इतर गुन्ह्यांत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून न्यायालयात खटले सुरू आहेत. 

मोहम्मद शफी याने मृत व्यक्तींच्या, तसेच गोव्याबाहेर व विदेशात राहत असलेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रे करून बळकावणे, कोट्यवधी रुपयांना इतरांना विकल्याची माहिती पथकाला दिली आहे. अशा प्रकरणांत त्याच्या विरोधात म्हापसा पोलिसांनी प्रथम १४ मे २०१२ रोजी गुन्हा दाखल केला आहे. यात त्याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल होता. त्यात त्यांनी हणजुणे येथील सर्वे क्रमांक २०८/३ मधील जमीन मालकांची बोगस दस्तावेज तयार करून जमीन हडप केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी मोहम्मद याला १९ नोव्हेंबर २०१२ रोजी अटक झाली होती. पोलिसांनी ३१ जानेवारी २०१८ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून पुढील सुनावणी ६ जुलै २०२२ रोजी होणार आहे.

शफीच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे

म्हापसा पोलिसांनी २१ सप्टेंबर २०१२ रोजी शफीसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात त्यांनी हणजुणे येथील सर्वे क्रमांक २८९/१ मधील जमीन हडप केल्याचे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणी पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला होता.       

पर्वरी पोलीस स्थानकात २० आॅक्टोबर २०१३ रोजी शफीसह तिघांवर गुन्हा दाखल आहे. नंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हा विभागात (ईओसी) वर्ग करण्यात आले. या प्रकरणी ईओसीने ३१ जानेवारी २०२२ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पुढील सुनावणी ८ जुलै २०२२ रोजी होणार आहे.       

आर्थिक गुन्हा विभगाने ११ फेब्रुवारी २०१४ रोजी शफीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात त्यांनी इतरांच्या मदतीने सुकूर येथील सर्वे क्रमांक ३७२/२ मधील १,१५० चौ. मी. जमीन हडप केल्याचे नोंद होते. या प्रकरणी ईओसीने २१ डिसेंबर २०१८ रोजी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.       

आर्थिक गुन्हा विभागाने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात त्यांनी इतरांच्या मदतीने पिळर्ण येथील सर्वे क्रमांक ४४/२ मधील २,०३० चौ. मी. जमीन हडप केल्याचे नोंद होते. या प्रकरणी ईओसीने ३१ जानेवारी २०२० रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.       

विशेष तपास पथकाने १८ जून २०२२ रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणा शफीने इतरांच्या मदतीने गोंगुरे-आसगाव (बार्देश) येथील जमीन हडप केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी त्याला २१ रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा