हळदोणा मतदारसंघ अंधारात

बार्देश, पेडणे, ​तिसवाडीत काही तास वीजपुरवठा खंडित

|
22nd May 2022, 11:59 Hrs
हळदोणा मतदारसंघ अंधारात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
वीज खात्याने थिवी उपवीज केंद्रातील डागडुजीसाठी बार्देश व पेडणे तालुक्यांसह तिसवाडीतील काही भागाचा वीजपुरवठा रविवारी खंडित केला होता. यापासून नास्नोळा वीज केंद्राचा परिसर वगळण्यात आला होता. पण, रात्री ९च्या सुमारास नास्नोळा केंद्रातील जम्पर उडाल्याने संपूर्ण हळदोणा मतदारसंघाची बत्ती गुल्ल झाली.
थिवी वीज केंद्राच्या दुरुस्ती कामासाठी वीज खात्याने योग्य नियोजन केले होते. खंडित वीज पुरवठ्यामुळे बार्देशमध्ये पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून डिचोली फिडरमार्फत आमोणा वीज केंद्रातून अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पाला वीज जोडणी दिली होती. तसेच नास्नोळा वीज केंद्राचा नाहक वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये, यासाठी या केंद्राला पणजी वीज उपकेंद्राद्वारे वीज जोडणी देण्यात आली होती.
बार्देश तालुक्यात फक्त हळदोणा मतदारसंघातील सहा गावांचा वीजपुरवठा सुरू होता. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांना दिवसभरात वीज समस्या जाणवली नाही. पण, रात्री ९च्या सुमारास नास्नोळा वीज केंद्रातील ३३ केव्ही वाहिन्यामधील जम्परमध्ये बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण हळदोणा मतदारसंघाचा वीजपुरवठा खंडित झाला. वीज कर्मचार्‍यांकडून हा जम्पर बदलण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, पावसामुळे या कामात अडचण निर्माण झाली होती.
वीज खात्याने रविवारी तालुक्याचा पुरवठा खंडित करण्याचे वेळापत्रक जारी केले होते. या वेळापत्रकातून ऐनवेळी नास्नोळा वीज केंद्राला न वगळता केंद्रातील डागडुजी हाती घ्यायला हवी होती. तसे न केल्यामुळे केंद्रात बिघाड झाला आणि लोकांना अंधारात टाकण्याचा प्रकार वीज खात्याने केला आहे, असा आरोप करीत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावर हळदोणावासीयांनी संताप व्यक्त केला.

वीजपुरवठा खंडित असल्यामुळे लोकांनी घरात राहून उकाडा सहन करण्यापेक्षा समुद्रकिनारी तसेच ज्या भागात वीजपुरवठा आहे त्या भागातील आपल्या नातेवाईकांकडे व पर्यटनस्थळी जाऊन मौजमजा केली.