अखेरच्या सामन्यात पंजाबचे ‘बल्लेबल्ले’

सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून किंग्जकडून पराभव : हरप्रीत ब्रारचे सामन्यात ३ बळी

|
22nd May 2022, 11:50 Hrs
अखेरच्या सामन्यात पंजाबचे ‘बल्लेबल्ले’

मुंबई : पंजाब किंग्जने आयपीएल २०२२ मधील शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ५ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने १५८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पंजाबने १५.१ षटकांत लक्ष्य गाठले. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. त्याचबरोबर हरप्रीत ब्रारने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. त्याने २६ धावांत ३ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबसाठी जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन सलामीला आले. धवनने ३२ चेंडूंचा सामना करत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. तर बेअरस्टो १५ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. शाहरुख खान १० चेंडूत १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मयंक अग्रवालला केवळ एक धाव करता आली. जितेश शर्माने ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९ धावा केल्या.

शेवटी लिव्हिंगस्टोनने तुफानी फलंदाजी केली. त्याने २२ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. तर प्रेरक मंकड ४ धावांवर नाबाद राहिला. त्याने एका चेंडूत चौकार मारला होता. अशाप्रकारे पंजाबने १५.१ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. हैदराबादकडून गोलंदाजी करताना फारुकीने ४ षटकांत ३२ धावा देत २ बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने २ षटकांत १९ धावा देत १ बळी घेतला. उमरान मलिकने २.१ षटकांत २४ धावा देत एक विकेट घेतली. जगदीशालाही एक यश मिळाले.

सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले. यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि शेफर्ड यांनी संघासाठी दमदार फलंदाजी केली. शेफर्डने १५ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. तर अभिषेक शर्माने ४३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. हरप्रीत ब्रारने पंजाबसाठी धोकादायक गोलंदाजी करताना ३ बळी घेतले.                  

नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादसाठी प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा सलामीला आले. यादरम्यान प्रियम वैयक्तिक ४ धावांवर बाद झाली. तर अभिषेकने ४३ धावांची शानदार खेळी केली. त्याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने २० धावांचे योगदान दिले. त्याने १८ चेंडूत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. तर एडन मार्कराम २१ धावा करून बाद झाला. मार्करामने १२ चेंडूत २ चौकार मारले. नियमित कर्णधार केन विलियम्सनच्या जागेवर कर्णधारपद सांभाळणारा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन काही विशेष करू शकला नाही. तो १० चेंडूत ५ धावा काढून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने दमदार फलंदाजी केली. त्याने १९ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २५ धावा केल्या. तसेच जगदीशा सुचित खाते न उघडताच बाद झाली. भुवनेश्वर कुमार एक धाव काढून बाद झाला. शेवटी शेफर्डने फलंदाजी करताना नाबाद २६ धावा केल्या. त्याने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार ठोकले. अशाप्रकारे हैदराबादने २० षटकांत ८ गडी गमावून १५७ धावा केल्या. पंजाब किंग्जसाठी हरप्रीत ब्रारने धोकादायक गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २६ धावा देत ३ बळी घेतले. हरप्रीतने अभिषेक, राहुल आणि मार्करामला आपला शिकार बनवले. कागिसो रबाडाने ४ षटकांत ३८ धावा देत १ बळी घेतला. लियाम लिव्हिंगस्टोनला एकही विकेट मिळाली नाही. त्याने ४ षटकांत २५ धावा दिल्या. नॅथन एलिसने ४ षटकांत ४० धावा देत ३ बळी घेतले.       

हैदराबाद, पंजाब संघांत बदल      

हैदराबादने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले. कर्णधार केन विलियम्सनची जागा भरण्यासाठी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रोमारियो शेफर्डचा समावेश करण्यात आला. शेफर्डने सुरुवातीचे सामने खेळले, परंतु खराब कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आले होते. टी. नटराजनला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अष्टपैलू जगदीशा सुचितचे पुनरागमन झाले. दुसरीकडे पंजाबने तीन बदल केले होते. यामध्ये भानुका राजपक्षे, ऋषी धवन आणि राहुल चहर यांना वगळण्यात आले होते, तर शाहरुख खान दीर्घ कालावधीनंतर परतला आहे. त्यांच्याशिवाय प्रेरक मंकड आणि नॅथन एलिस हेही संघात आले होते.     

आयपीएल प्लेऑफ

प्लेऑफचे सामने आता २४ मेपासून सुरू होणार आहेत. क्वालिफायर-१ गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डन, कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे तर दुसरा एलिमिनिटर सामना २५ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येणार आहे. यानंतर २७ मे रोजी दुसरा क्वालिफयर अहमदाबाद येथे खेळवण्यात येईल तर अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे.