राजीनामा देऊन राजकारण करा

भाजप प्रदेशाध्यक्षांचा सत्यपाल मलिक यांना सल्ला


27th October 2021, 11:59 pm
राजीनामा देऊन राजकारण करा

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे.सोबत दामू नाईक आणि मिलिंद नाईक.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मुलाखत घेताना भडकवले आणि आपल्याला हवी ती उत्तरे त्यांच्या तोंडून वदवून घेतली. दुर्दैवाने राज्यपाल मलिकही त्यांच्या कारस्थानाला बळी पडले, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. राजकारण करायचेच असेल तर मलिक यांनी मेघालयच्या राज्यपालपदाचा राजीनामा देऊन करावे, असे आव्हानही तानावडे यांनी दिले.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी सायंकाळी पणजी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंत्री मिलिंद नाईक उपस्थित होते. पत्रकार राजदीप सरदेसाई यांना भाजप तसेच संघ परिवाराची अॅलर्जी आहे. राजदीप सरदेसाई यांनी मुलाखत घेतना आपले विचार राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मांडण्यास भाग पाडले. यामागे त्यांचे कारस्थान आहे. दुर्दैवाने राज्यपाल सत्यपाल मलिक हे राजदीप सरदेसाई यांच्या कारस्थानाला बळी पडले.
राज्यपालपद हे घटनात्मक पद आहे. या पदावर पोहोचल्यानंतर जबाबदारीने वक्तव्य करावे लागते. याचे भान राज्यपाल मलिक यांना राहिलेले नाही. सत्यपाल मलिक यांना राजकारणच करायचे असेल तर त्यांनी प्रथम राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर आरोप करावेत, असा सल्लाही तानावडे यांनी दिला. राज्यपाल मलिक यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करोना व्यवस्थापनात गोव्यात भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी मलिक यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना गोव्यातील करोना व्यवस्थापनाचे कौतुक केले होते. मेघालयचे राज्यपाल झाल्यानंतर त्यांना भ्रष्टाचार झाल्याचे कसे काय लक्षात आले, असा प्रश्नही तानावडे यांनी उपस्थित केला.
राजभवन इमारतीच्या आरोपांचे खंडण
नवे राजभवन बांधण्याचा गोवा सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला आपण मंजुरी दिली नव्हती, असे मलिक यांनी मुलाखतीत म्हटले होते. राजभवन ही वारसा इमारत आहे. नवी राजभवन इमारत झाली तरी जुनी इमारत तशीच राहणार आहे. जुन्या राजभवन इमारतीचे संरक्षण आणि संवर्धन केले जाईल. सत्यपाल मलिक गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी लिफ्ट बसवण्याचा प्रस्ताव दिला होता. जिना चढताना त्रास होत असल्याने लिफ्ट बसवावी, अशी त्यांची मागणी होती. तांत्रिकदृष्ट्या राजभवनात लिफ्ट बसवणे शक्य नाही. नव्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करणे शक्य होईल, असे सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा