पॅरा शिक्षकांचे दुसऱ्या दिवशीही आगशी पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन

|
30th July 2021, 11:47 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारी सेवेत कायम करावे, या मागणीसाठी गेले चार दिवस आंदोलन करणारे पॅरा शिक्षक गुरुवारी आझाद मैदानावरून विधानसभेवर मोर्चा नेण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत माहिती देऊन आंदोलन मागे घेण्याची सूचना पॅरा शिक्षकांना केली. मात्र, पॅरा शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन लिहून देण्यास सांगा असे पोलीस ‌अधिकाऱ्यांना सुनावले व शुक्रवारी आगशी पोलीस स्थानकावर ठिय्या आंदोलन केले.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे पर्वरी विधानसभा संकुल परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले होते. त्यामुळे तेथे मोर्चा नेण्यास बंदी होती. मात्र, कंत्राटी तत्त्वावर सेवेत असणाऱ्या व चार दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या पॅरा शिक्षकांनी गुरुवारी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेऊन आगशी पोलीस स्थानकात नेले व रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आले होते. मात्र, आपल्या मागण्यांसाठी पॅरा शिक्षकांनी घरी जाण्यास नकार देत आगशी पोलीस स्थानकावर ठाण मांडून आंदोलन सुरूच ठेवले आहे.