Goan Varta News Ad

वेळ गेल्यावर युतीबाबत चर्चा व्यर्थ : सरदेसाई

भाजपविरोधी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st July 2021, 11:52 Hrs
वेळ गेल्यावर युतीबाबत चर्चा व्यर्थ : सरदेसाई

भाताची लावणी करताना आमदार विजय सरदेसाई, उषा सरदेसाई व गोवा फॉरवर्डचे नगरसेवक. (संतोष मिरजकर)

मडगाव : गोवा फॉरवर्ड पक्ष निवडणुकीला घाबरतो म्हणून युती करण्याची मागणी करत नाही तर गोवा वाचवण्यासाठी गोमंतकीयांच्या मागणीनुसार भाजपला पर्याय म्हणून समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. ‘टीम गोवा’ हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी काँग्रेसशी युतीची चर्चा केली आहे. सर्व मतदारसंघांत ताकद असली तरी उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. वेळ गेल्यानंतर युतीबाबतची चर्चा करणे व्यर्थ ठरेल, असे स्पष्ट मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी मांडले आहे.
आमदार सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांसमवेत शेतात उतरत भाताची लावणी केली. यानंतर सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, राज्य सरकारने दाखल केलेली खाणींबाबची फेरविचार याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली. मूळ निवाड्यानंतर ६०० दिवसांनी फेरविचार याचिका दाखल केल्याचा हा परिणाम आहे. म्हादईची याचिका अजून सुनावणीसाठी आलेली नाही. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, त्यावेळी त्यांनी म्हादईचा प्रश्न त्यांच्यासमोर काढला होता का, हा प्रश्नही अनुत्तरित आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
केंद्रीय जहाज, बंदर व पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोळसामुक्त मुरगाव बंदर करण्याबाबत पाठवलेल्या पत्रावर पदाचा ताबा घेताच प्रतिसाद दिला. राज्याच्या भल्यासाठी कोळशाचा हब बनवण्याचे सुरू असलेले प्रयत्न त्यांनी हाणून पाडावेत, असे विजय सरदेसाई यावेळी म्हणाले.