Goan Varta News Ad

तीन आयएएस, २० अधिकाऱ्यांच्या बदल्या

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th May 2021, 12:08 Hrs
तीन आयएएस, २० अधिकाऱ्यांच्या बदल्या

पणजी : तीन आयएएस व नागरी सेवेतील सुमारे २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संजीत रॉड्रिग्स, संजीव गडकर, नारायण गाड आदी अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. पणजी महानगरपालिकेचे (मनपा) आयुक्त असलेल्या आयएएस संजीत रॉड्रिग्स यांची ‘दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२’ म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी असलेल्या आग्नेल ए. जे. फर्नांडिस यांची मनपा आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आयएएस अधिकारी संजीव गडकर यांची अबकारी आयुक्त, तर उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी मामू हागे यांची ‘उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२’ पदावर बदली झाली आहे.
नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांत उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ पदावर असलेल्या नारायण गाड यांची गोवा हस्तकला ग्रामीण व लघु उद्योग विकास महामंडळाच्या (जीएचआरएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदी, अबकारी​ खात्याचे अ​तिरिक्त आयुक्त असलेल्या प्रशांत शिरोडकर यांची वीज खात्याचे (प्रशासन) संचालक म्हणून बदली झाली आहे. तर शिक्षण विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुही रेडकर यांच्याकडील समग्र शिक्षा अभियानच्या प्रकल्प अधिकारीपदाचा अतिरिक्त ताबा काढून घेण्यात आला आहे. पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रीनेत कोठावळे यांच्याकडे तुरुंग महानिरीक्षक, तर सुधीर केरकर यांच्याकडे अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षकपदाचा ताबा देण्यात आला आहे.
कनिष्ठ स्तरावरही बदल्या
कनिष्ठ अ​​धिकाऱ्यांत कुडचडे-काकोडा पालिकेचे मुख्याधिकारी तसेच मडगाव रवींद्र भवनचे सदस्य सचिव अजय गावडे यांची उत्तर गोवा उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली असून, त्यांच्याकडे महसूल उपजिल्हाधिकारी (महसूल) पदाचा अतिरिक्त ताबा राहील. कृषी, नगर​नियोजनमंत्र्यांचे अव्वर सचिव हसुदिन नातू यांच्याकडे केवळ महसूल-१ चे अव्वर सचिवपद ठेवण्यात आले आहे. सचिन देसाई, वीरा नायक, रमेश गावकर, दत्तराज गावस देसाई, अवित नाईक, पी. ए. परब, प्रतीमा ब्रागांझा, मिलाग्रीस सुआरीस या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.