पाच पालिकांसाठी उद्या मतदान; निर्बंधही जारी

प्रचार संपला; ४०२ उमेदवार रिंगणात


21st April 2021, 11:52 pm
पाच पालिकांसाठी उद्या मतदान; निर्बंधही जारी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : करोना प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने बुधवारपासून राज्यात निर्बंध लागू केले असले, तरी पाच पालिकांतील निवडणुकांसह पंचायतीच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारीच मतदान घेण्याचे निश्चित केले आहे. या निवडणुका आणि पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार बुधवारी संपला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत मतदान आणि मतमोजणीसाठी काही निर्बंध लागू केले आहेत. पालिका निवडणुकांच्या रिंगणात एकूण ४०२ उमेदवार आहेत.
म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या पालिकांची निवडणूक तसेच वेळ्ळी पंचायतीतील प्रभाग चारमधील पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ८ पासून मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या सोमवारी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी काळात निवडणुका होत असलेल्या पालिका तसेच पंचायत क्षेत्रात जमावबंदी आदेशाचे कडक पालन करण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणी काळात केंद्रांवर गर्दी होऊन करोनाचा प्रसार आणखी वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधही जारी केले आहेत.
दरम्यान, म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच पालिकांतील आरक्षण तसेच प्रभाग फेररचनेचा वाद प्रथम उच्च आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने नव्याने आरक्षण जारी करून ३० एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी पाचही पालिकांत मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या काही दिवसांत समर्थन दिलेल्या पॅनेल्सचा जोमाने प्रचार केला आहे.
असे राहतील निर्बंध
- मतदानादिवशी सर्वच ठिकाणच्या मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरातील रेस्टॉरन्ट, बार, चहा-पानाची दुकाने तसेच इतर खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत, तसेच मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटर अंतरावरील अशी दुकाने सकाळी ६ ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंद राहतील.
- मतदान आणि मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यासही बंदी असेल.

हेही वाचा