एक वर्षानंतरही कोविडयोद्ध्यांना वेतनवाढ नाही हे दुर्दैवी

आपचे संयोजक राहुल म्हांबरे यांचे सरकारवर टीकास्त्र


09th April 2021, 12:22 am
एक वर्षानंतरही कोविडयोद्ध्यांना वेतनवाढ नाही हे दुर्दैवी

फोटो : राहुल म्हांबरे
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना २० टक्के वेतनवाढ व ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले आहे. अद्यापही ही घोषणा सत्यात उतरलेली नाही हे दुर्दैवी आहे, अशी खंत आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी व्यक्त केली.
कोविडबाबत दिल्ली सरकारच्या अनुकरणीय कृतीबाबत म्हांबरे म्हणाले, दिल्लीतील आप सरकार कोविडला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी एक चांगले मॉडेल घेऊन आले आहे. त्याचे स्वागत इतर काही राज्यांनी केले आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्ही परिश्रमपूर्वक तयार केलेली कागदोपत्री श्वेतपत्रिका सादर करूनसुद्धा गोव्याने दिल्ली मॉडेलकडून काहीच बोध घेतलेला नाही. गोव्याला आता दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागणार आहे. दुसऱ्या लाटेला वेगळ्या पद्धतीने सामोरे जाण्याची गरज आहे, हे लक्षात न घेता सरकार पूर्वी हाताळल्या गेलेल्या कार्यपद्धतींचा अवलंब करत आहे. त्यामुळे सरकार अपयशी ठरत आहे. गोवा सरकार श्वेतपत्रिकेतील शिफारशी लागू करण्याचे काम करेल आणि किमान पाच कलमी धोरण अवलंबेल, अशी आशा आहे. यामध्ये घरगुती अलगीकरण, मृत्यूची संख्या कमी करणे, रुग्णवाहिका व्यवस्थापन आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुसरी लाट गांभीर्याने घेण्याची आणि गोव्यातील लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत उत्कृष्ट निकाल देणारा टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, ट्रॅकिंग आणि टीम इत्यादींचा समावेश असलेला ‘५ टी’ फॉर्म्युला गोव्यामध्येही अवलंबला जाणे आवश्यक आहे. रुग्ण वाढत असल्यामुळे गोव्यातील चाचणी सुविधा वाढविण्याचे आवाहनही राहुल म्हांबरे यांनी केले.
कोट
घरातील अलगीकरणासाठी सरकारने योग्य मार्गदर्शक सूचना द्याव्यात. गोव्यात कोविडच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने गोव्यात अलगीकरणासाठी अधिक सुविधा द्याव्यात. गोव्याचा २० टक्के कोविड पॉझिटिव्ह दर देशात सर्वाधिक आहे. मडगाव व कळंगुट हे नवीन ‘हॉटस्पॉट’ म्हणून उदयास येत आहेत.
_ राहुल म्हांबरे, नेते, आप