कोलवाळ कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसला

कैदी उपेंद्र नाईक, हुसैन कोड पुन्हा गजाआड

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th March 2021, 11:38 pm
कोलवाळ कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसला

म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून पलायन करण्याच्या इराद्याने लपलेल्या उपेंद्र उर्फ रुपेंद्र नाईक (मिर्झापूर) व हुसैन कोड (कर्नाटक) या दोघा कैद्यांना शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गजाआड करण्यात यश आले. जुन्या कार्यालय विभागाच्या मागे गटारात लपलेल्या या दोघा कैद्यांना पकडण्यात यश आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी कैद्यांना जेवण वितरित केल्यानंतर गणतीवेळी वरील दोघेही कच्चे कैदी बेपत्ता असल्याचे कारागृह कर्मचार्‍यांना आढळून आले होते. सर्व कारागृहात शोध घेऊनही ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी पलायन केल्याचा संशय व्यक्त करून कारागृहातील अधिकार्‍यांनी म्हापसा पोलिसांना कल्पना दिली होती.
तुरुंग महानिरीक्षक वेनान्सिओ फुर्तादो, आयआरबी अधीक्षक शोबीत सक्सेना, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह कर्मचारी व पोलिस पथकाने कारागृहात शोधमोहीम राबविली होती. पण रात्री उशिरापर्यंत दोघेही कैदी हाती लागले नव्हते.
कारागृहातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास टेहळणी टॉवरवरील आयआरबी जवानांना जुन्या कार्यालय इमारतीच्या मागील बाजूने पाईपवरून दोघेजण खाली उतरत असल्याचे दिसून आले. हे बेपत्ता कैदीच असावेत, याची खात्री जवानांना झाली. लगेच त्यांनी वरिष्ठांना कल्पना देऊन सतर्क केले. त्यानंतर कारागृह अधिकार्‍यांना ही माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच जेलर व तुरुंग कर्मचार्‍यांनी तेथे धाव घेतली. दोघेही कैदी इमारतीवरून खाली उतरून गटाराच्या कडेला लपून बसले होते. कर्मचार्‍यांनी त्यांना पकडले व त्यांची रवानगी पुन्हा अंडर ट्राईल विभागात केली.

पळण्याचा पूर्वनियोजित कट...
- सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाकडून कैद्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत घेतली जाते. या कॉन्फरन्सची व्यवस्था कारागृहाच्या जुन्या कार्यालय विभागात केलेली आहे. शुक्रवारी सायंकाळी ३ च्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीसाठी कैद्यांना विभागात नेण्यात आले होते. त्यामुळे विभागाचा दरवाजा खुला होता. हीच संधी साधून उपेंद्र व हुसैन या कैद्यांनी आतमध्ये प्रवेश केला.
- प्रथम ते पहिल्या मजल्यावर जाऊन लपून बसले. सतर्कतेचा सायरन वाजवल्यानंतर कारागृहात आपली शोधमोहीम सुरू झाल्याची कल्पना त्यांना आली. त्यामुळे ते एका छोट्याशा खोलीत लपले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सावधगिरी बाळगून दोघेही इमारतीवरून खाली उतरले व गटारावर लपून बसून भिंतीवरून उडी टाकण्याची योजना आखत असतानाच कर्मचाऱ्यांनी पकडले. हा त्यांचा पूर्वनियोजित कट होता.

हेही वाचा