Goan Varta News Ad

नगरपालिका निवडणूक : उच्च न्यायालयाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

|
04th March 2021, 01:25 Hrs


पणजी : 

पाच नगरपालिकांची निवडणूक रद्द ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सकाळी स्थगिती दिली. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता आणि एडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी राज्य सरकारच्या बाजूने तर एएनएस नाडकर्णी यांनी राज्य सरकारच्या विरोधात बाजू मांडली. न्यायाधीश आर. नरीमन आणि एच. रॉय यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निवाड्याला स्थगिती देण्यासोबतच, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशासही स्थगिती दिली आहे. त्यामुळे, या पाच  नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. 

पालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती देत मडगाव, म्हापसा, केपे, सांगे आणि मुरगाव पालिकेच्या निवडणुका नव्याने जाहीर करण्याचे आदेश दिले होते. १५ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असेही न्यायालयाने म्हटले होते. त्या निवाड्याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पाच पालिकांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या होत्या. इतर सहा पालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती. आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे.