Goan Varta News Ad

बारावीची २४ एप्रिल, दहावीची २० मेपासून परीक्षा!

करोनाबाधित, संपर्कातील विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था : शेट्ये

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd March 2021, 11:51 Hrs
बारावीची २४ एप्रिल, दहावीची २० मेपासून परीक्षा!

पणजी : बारावीची परीक्षा २४ एप्रिल, तर दहावीची परीक्षा २० मेपासून सुरू होणार आहे. करोनाची नियमावली पाळून परीक्षा घेण्यात येतील. शिवाय करोनाबाधित ​किंवा ज्यांच्या घरी करोनाची लागण झालेले रुग्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
बारावीची अंतिम परीक्षा २४ एप्रिल ते १७ मे या कालावधीत होणार आहेत. जेईई परीक्षा २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार असल्याने बारावी अंतिम परीक्षेच्या वेळापत्रकात काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. २४ एप्रिलपासून या परीक्षा सुरू होतील. प्रत्येक पेपर सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी ९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर उपस्थित रहाणे आवश्यक आहे, असे शेट्ये म्हणाले. दहावीची परीक्षा २० मे ३ जून या कालावधीत घेण्यात येईल. बारावी परीक्षेचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावी निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बारावी परीक्षेसाठी १८ केंद्रे आणि सुमारे ९० उपकेंद्रे असतील. करोनामुळे माशेल येथील एका मुख्य केंद्रासह उपकेंद्रांतही वाढ करण्यात आली आहे. करोना प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझर या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून परीक्षा घेण्यात येतील. परीक्षेसाठी बसणाऱ्या दोन विद्यार्थ्यांत दीड मीटरचे अंतर ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परीक्षेसाठी ​निश्चित केल्या जाणाऱ्या केंद्र आणि उपकेंद्रांवर वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतील. परीक्षा काळात एखाद्या विद्यार्थ्याला आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या तर त्याला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार दिले जातील. करोनाबाबतच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होणार असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील, असा विश्वासही शेट्ये यांनी व्यक्त केला.
प्रथमच मुलींपेक्षा मुले अधिक!
बारावीच्या अंतिम परीक्षेला यंदा १९,२४१ विद्यार्थी बसणार आहेत. त्यात मुलींची संख्या ९,५६८ व मुलांची संख्या ९,६७३ इतकी आहे. मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे भगीरथ शेट्ये म्हणाले. कला शाखेतून ५,१०७, वाणिज्यमधून ५,८१५, विज्ञानमधून ४,९८८, तर व्यावसायिक शाखेतून ३,३३१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ विद्यार्थ्यांना जूनमध्ये देता येणार परीक्षा
परीक्षा काळात करोनाबाधित असलेल्या किंवा ज्यांच्या घरी करोनाबाधित रुग्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात येईल. करोनाबाधित असलेले जे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या परीक्षा देण्यास समर्थ नसतील, त्यांना जूनमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेवेळी संधी देण्यात येईल, असेही भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.