स्थानिकांना कंत्राट न मिळाल्यास आंदोलन

काँग्रेसचा ‘आयएसएल’च्या आयोजकांना इशारा; लेखी हमीस स्पष्ट नकार


22nd November 2020, 12:46 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : आयोजकांनी दिलेल्या हमीनुसार इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) विविध कामांचे कंत्राट सोमवारपर्यंत स्थानिकांना न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. पोलिसांनी आम्हाला अटक केली तरी चालेल. गोमंतकीयांच्या हक्कांसाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत, असा इशारा काँग्रेसने शनिवारी दिला.

आयएसएल फुटबॉल सामन्यांत अडथळे आणत असल्याचा संशय वर्तवत पोलिस शुक्रवारी रात्रीपासून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, युवा काँग्रेसचे वरद म्हार्दोळकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी व अमरनाथ पणजीकर यांच्या मागावर होते. पोलिस या चौघांच्या घरीही गेले होते; पण ते सापडले नव्हते. अखेर शनिवारी सकाळी या चौघांनीही पणजीत दाखल होत महासंचालक मुकेशकुमार मीना यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे त्यांनी पणजी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली.

दरम्यान, अधीक्षकांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संकल्प आमोणकर म्हणाले, आयएसएलच्या खेळाडूंसाठी लागणारी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, जनरेटर आदींची कामे स्थानिकांना देण्याची मागणी करणारे निवेदन आम्ही याआधीच आयएसएलचे व्यवस्थापन, दोन्ही जिल्हाधिकारी तसेच सरकारलाही सादर केले होते. पण सरकारने यात लक्ष न घातल्याने खेळाडू बाहेरच्या राज्यांतील वाहने वापरत होते. त्याबाबत आम्ही आवाज उठवल्यानंतर आयएसएलच्या व्यवस्थापनाने काँग्रेस भवनात दाखल होऊन आमची भेट घेतली. तसेच सोमवारपर्यंत आयएसएलच्या कामांची कंत्राटे स्थानिकांना देण्याचे मान्य केले. त्यामुळे सामने सुरू झाले असले तरी आम्ही शांतच बसलो आहोत, असे आमोणकर म्हणाले.

आमच्यावर दबाव आणण्यासाठी पोलिस आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबाबत आम्ही अधीक्षकांची भेट घेतली. आयएसएलच्या सामन्यांत गोंधळ न घालण्याबाबत लेखी हमी देण्याची अट अधीक्षकांनी आम्हाला घातली आहे. पोलिसांची ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. सोमवारपर्यंत आयोजकांनी दिलेला शब्द न पाळल्यास स्थानिकांसाठी तीव्र आंदोलन छेडू, असेही त्यांनी नमूद केले.

आम्ही आयएसएल स्पर्धा किंवा खेळाडूंच्या विरोधात नाही. करोनामुळे आर्थिक संकट ओढवलेल्या स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठीच आम्ही आवाज उठवत आहोत. त्यामुळे आमच्या मागण्या आयएसएल आयोजकांनी पूर्ण कराव्यात, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले. सरकारला जमले नाही ते काँग्रेस पदाधिकार्‍यांनी करून दाखवले. हे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना रुचलेले नाही. त्यामुळेच ते पोलिसांमार्फत आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप जनार्दन भंडारी यांनी केला.

नीता अंबानींसाठीच खटाटोप : वरद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतसुद्धा अंबानी कुटुंबाच्या तालावर नाचत आहेत. आयएसएलच्या निमित्ताने नीता अंबानी गोव्यात येणार आहेत. त्यांना त्रास होऊ नये, यासाठीच ते काँग्रेस कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहेत, अशी टीका वरद म्हार्दोळकर यांनी केली. आयएसएलचे सामने मार्चपर्यंत असणार आहेत. हे लक्षात घेऊन आयोजकांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असा इशाराही त्यांनी दिला.