Goan Varta News Ad

कष्ट करा, आत्मनिर्भर व्हा : मुख्यमंत्री

- द गोवा कपिला मल्टिपर्पज सोसायटीच्या तुये शाखेचा शुभारंभ

Story: हरमल : |
31st October 2020, 12:22 Hrs
कष्ट करा, आत्मनिर्भर व्हा : मुख्यमंत्री

हरमल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प करून देशवासीयांना मेहनत व कष्ट करण्यास प्रवृत्त केले आहे. त्या घोषणेचा अवलंब करताना सरकारी योजनांचा लाभ घेऊन जीवन समृद्ध करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तुये येथे केले.

 द गोवा कपिला मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक ह्या नात्याने ते बोलत होते. ते म्हणाले, कोविडच्या परिस्थितीमुळे आमचे डोळे उघडले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. भाजीपाला, दूध, कडधान्य, अंडी, चिकन आदी वस्तूंसाठी आम्हाला अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागते, हे दिसून आले. त्यासाठी गोमंतकीयांनी कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची खरी गरज आहे. आगामी काळात कपिला सोसायटीने संकल्पानुरूप काम सुरू ठेवावे. त्यामुळे ग्राहक तसेच जनतेस लाभ होईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकार निबंधक बिजू नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. 

 यावेळी व्यासपीठावर तुयेचे सरपंच सुहास नाईक उपस्थित होते. तुये शाखेत मार्गदर्शक समितीपदी नीलेश कांदोळकर, आनंद साळगावकर, गोपाळ शेट्ये, प्रवीण तिळवे, संजय परब व कृष्णा नाईक यांनी निवड करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश शेटमांद्रेकर दांपत्याने सत्यनारायण महापूजा केली. महिला कर्मचार्‍यांनी स्वागत गीत सादर केले. त्यांना साथसंगत राजेश पुरखे व राजीव गावकर यांनी केली. कर्मचारी सिया शेटगांवकर, उत्कर्षा पार्सेकर, रिया सावंत व आशया शेटगांवकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालक स्मिता पार्सेकर यांनी प्रास्ताविक, संचालक सदगुरू नाईक यांनी पाहुण्यांची ओळख, सूत्रनिवेदन संचालक अरुण बांधकर यांनी केले. संचालक विलसिनी नाईक यांनी आभार मानले. यावेळी संचालक मंडळातील संतोष तिळवे, विश्राम शेटगावकर, विष्णू परब व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 

‘कपिला’चे अध्यक्ष प्रा. पार्सेकर म्हणाले, 

* २०१३ साली स्थापन केलेल्या कपिला पंतसंस्थेने ग्राहक व भागधारकांच्या बळावर यशस्वी वाटचाल केली आहे. हरमल, मांद्रे, मोरजी व आज उद्घाटन केलेली तुये अशा चार शाखा कार्यान्वित असून, उत्तर गोवा हे कार्यक्षेत्र असल्याने आगामी काळात विस्तार योजना दृष्टीपथात आहे. 

* बँकिंग क्षेत्राचा अनुभव गाठीशी बाळगून संस्थेच्या मल्टिपर्पज उद्दिष्टांची कार्यवाही करताना संस्था स्वतःच्या मालकीची मोठी जमीन घेण्याच्या विचारात आहे. त्या जमिनीतून संस्थेचे प्रधान कार्यालय, महिला स्वयंसहाय गटांना काम तसेच शेतीउत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी खरेदी विक्रीची सोय करण्यात येईल. ज्यातून शेतकर्‍यांना योग्य भाव मिळेल.