परतीच्या पावसाने सत्तरीत भातशेतीचे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:52 pm

वाळपई : गेल्या चार दिवसांपूर्वी सतत तीन दिवस कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे सत्तरी तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे यंदा भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे सत्तरीत जमीन मालकीसंदर्भात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे अनेकांकडे कृषी कार्ड सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना ही नुकसान भरपाई मिळणार नाही. यामुळे पुन्हा एकदा सत्तरीतील जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. गोवा सरकारने जमीन मालकीच्या संदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन सत्तरी तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी आता हळूहळू वाढू लागली आहे.
सध्यातरी भात शेती अंतिम टप्प्यात आली असून परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेत जमिनीवर पडून पिकाची नासाडी झाली आहे. सध्या भात कापणीचे काम सुरू असून काही ठिकाणी भात पिकण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे व जोरदार वाऱ्यामुळे उभे असलेले भात आडवे पडले आहे. तालुक्यातील सावर्डे, नगरगाव, ठाणे, खोतोडा आदी भागांत भाताचे मोठे नुकसान झाले आहे.