कांदा, भाजी दर स्थिर ठेवा

आमदार रेजिनाल्ड यांची मागणी


24th October 2020, 10:33 pm
कांदा, भाजी दर स्थिर ठेवा

आवश्यकता भासल्यास रेजिनाल्ड यांचा फोटो घेणे

---

 

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कृषिमंत्री बाबू कवळेकर यांना पत्र पाठवून कांद्याच्या वाढत्या दराबाबत चिंता व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांना भाजी व कांद्याचे वाढीव दर परवडणारे नसल्याने फलोत्पादनाच्या भाजी व कांदा यांचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड यांनी केली आहे.

आमदार रेजिनाल्ड पत्रात पुढे म्हणतात, कांद्याचे दर महिन्याभरात शंभरीपार गेले आहेत. फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झांट्ये यांनाही पत्राची प्रत पाठवण्यात आलेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला प्रतिकिलो ३० रुपयांनी मिळणारा कांदा आता शंभरीपार गेलेला आहे. तसेच टोमॅटो ४० रुपये किलो, आले १८० रुपये किलो, कॉलिफ्लॉवर ४५ रुपये किलो अशाप्रकारे भाजीपाल्याचे दरही वाढलेले दिसून येत आहेत. आधीच करोना महामारीच्या सात महिन्यांच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकलेले आहे. त्यातच आता रोजच्या स्वयंपाकातील कांद्याचे दरही वाढल्याने कांद्याची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. याबाबत कुडतरीतील नागरिकांकडूनही तक्रारी येत असून फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉलवरील दर स्थिर राहण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड यांनी केली आहे.