Goan Varta News Ad

छायाचित्राचा अवर्णनिय छंद जोपासणारे प्रशांत गावकर

सुर्लातील विविध निसर्ग चित्रे बंदिस्त करणारा अवलिया

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September 2020, 12:17 Hrs

नगरगाव : आपल्या अवतीभवती अनेक मोहक अशा गोष्टी असतात, ज्या खुलून दिसतात. छायाचित्राच्या माध्यमातून परिसरातील घटना टिपल्यास त्या कायम बंदिस्त राहणार आहेत. अशाच प्रकारे छायाचित्राला छंदाची जोड देऊन आकर्षक अशी निसर्ग छायाचित्रे टिपणारा सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावातील युवक प्रशांत रमेश गावकर.
सत्तरीतील निसर्गसौंदर्याने नटलेल्या सुर्ला गावात प्रशांत गावकर यांचा जन्म झाला. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुर्ला येथेच झाले. पुढील शिक्षण साखळी सरकारी महाविद्यालयात त्याने पूर्ण केले. त्यानंतर २००८ साली दोन वर्षांचा डिप्लोमा इन नर्सिंग, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्यूकेशन बांबोळीमध्ये पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्षे खासगी कंपनीत काम केले. पण हे सर्व करताना प्रशांतला भूक लागली होती ती म्हणजे कॅमेरातून छायाचित्रण करण्याची. प्रशांतला मूळात चित्रकलेची, लेखनाची आणि फोटो काढण्याची खूप आवड होती. सुरुवातीला प्रशांतजवळ मोबाईल, कॅमेरा ही साधने उपलब्ध नव्हती. पण कधी भावंडांचा किंवा मित्रांचा मोबाईल भेटला की त्यात जे दिसेल त्यांचे तो छायाचित्रीकरण करीत होता. कुणाचेही फोटो घेऊन दिवसभर एडिटिंग करायचा. अशातूनच फोटोग्राफीत त्याचा एवढा रस वाढतच गेला की नंतर त्याने डिजिटल सिंगल-लेन्स रिफ्लेक्स (डीएसएलआर) कॅमेराविषयी थोडीफार माहिती घेतली. त्याचे स्वप्न होते ते म्हणजे स्वत:चाही एक डीएसएलआर कॅमेरा असावा. २०११ मध्ये प्रशांतचे ते स्वप्न पूर्ण झाले. त्यातूनच फोटोग्राफीची आवड आणखी वाढत गेली. या क्षेत्राविषयीची अधिक माहिती मिळविण्यासाठी त्याने म्हापसा येथील प्रसाद पाणकर यांच्याकडे सीएमवायके फोटोग्राफी अकॅडमीचे शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांच्या या आवडीत अजूनच भर पडली.
या कलेच्या माध्यमातून प्रशांत गावकरने निसर्गातील विविध मनमोहक अशा घटना, पशु-पक्षी, धबधबे, नयनरम्य ठिकाणे, झाडे, फुलांवर बसलेले फुलपाखरू आदी छायाचित्रे कॅमेरात टिपली. राज्यात कुठेही फिरत असताना प्रशांत एखादी घटना दिसली की लागलीच कॅमेरा हातात धरून ते चित्र अापल्या कलाकुशलतेने कॅमेरात बंदिस्त करतो. मनुष्याला एखाद्या गोष्टीचा छंद जडला की त्यात तो रममाण होऊन जातो.
आपली नोकरी संभाळून प्रशांत छंद म्हणून वेळ मिळेल तेव्हा भटकंती करीत असतो. होंडा येथे एका ठिकाणी उडणारा लांडोरचे टिपलेले छायाचित्र प्रसन्न करून टाकते. मये, हरवळे येथील शेतातील झाडे, किलबिल करणारे पक्षी, फुलपाखरू, सूर्यास्त, विविध पावसाळ्यात कोसळणारे धबधबे त्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. या छायाचित्रीकरणाद्वारे त्याने धबधबा परिसरात पडलेली निसर्गाची प्रतिकृती ‍सुरेखरीत्या टिपली आहे. सुर्ला गावातील प्रशांत गावकर म्हणजे या परिसरातील विविध निसर्ग चित्रे बंदिस्त करणारा अवलियाच म्हणावा लागेल.