Goan Varta News Ad

एससी-एसटी आयोगाचे अध्यक्ष तत्काळ नेमा

गाकुवेध फेडरेशनची मागणी : ४ सप्टेंबरपासून पद रिक्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September 2020, 12:15 Hrs

मडगाव : एससी-एसटी आयोगाचे अध्यक्षपद ४ सप्टेंबरपासून रिक्त आहे. या रिक्तपदावर राज्य सरकारकडून वकिलीचा अनुभव असलेल्या, एससी-एसटी समाजाशी बांधिलकी असलेल्या समाजातील योग्य व्यक्तीची नेमणूक तत्काळ करावी, अशी मागणी गाकुवेध फेडरेशनकडून करण्यात आली आहे.
गाकुवेध फेडरेशनचे सरचिटणीस रूपेश वेळीप यांनी पत्रकार परिषदेत आयोगाचे रिक्त अध्यक्षपद भरण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे सदस्य रामा काणकोणकर व अॅड. ज्यो फर्नांडिस उपस्थित होते. वेळीप यांनी सांगितले की, एससी-एसटी आयोगाचे अध्यक्षपद चार सप्टेंबरपासून रिक्त आहे. याआधीचे अध्यक्षही आठवड्यातील दोन दिवसांसाठी उपलब्ध होत होते. त्यामुळे यावेळी तरी राज्य सरकारने पूर्णवेळ अध्यक्षांची नेमणूक करावी. आदिवासी समाजातील लोकांसाठी कार्यरत या आयोगाची जबाबदारी मोठी असल्याने व समाजातील व्यक्तींना न्याय मिळण्याच्या ठिकाणचे मुख्य पद रिक्त ठेवण्यात येऊ नये. या आयोगामुळे आदिवासी समाजातील नागरिकांचे हक्क अबाधित राहत असल्याने या पदावर किमान दहा वर्षे वकील म्हणून कार्यरत असणार्‍या किंवा निवृत्त न्यायाधीशांची समाजातील व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी वेळीप यांनी केली.
आयोगाच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीची नेमणूक करताना त्याचे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीत याची खात्री करून घ्यावी. सत्तरीतील लता गावकर यांची केपे येथे करण्यात आलेली नियुक्ती या प्रकरणासह अन्य प्रकरणेही एससी-एसटी आयोगाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे या प्रलंबित प्रकरणांना निकाली काढण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षपदी पात्र ठरणार्‍या व्यक्तीची तत्काळ नेमणूक करा. _ रूपेश वेळीप, सरचिटणीस, गाकुवेध फेडरेशन