देशात १ ऑगस्टपासून ‘अनलॉक-३

केंद्रीय गृहमंत्रालयाची घोषणा; प्रतिबंधित क्षेत्रांना मात्र शिथिलता नाही

|
30th July 2020, 02:00 Hrs

नवी दिल्ली : देशात कोविड-१९‌ विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागांसाठी १ ऑगस्टपासून ‘ऑनलॉक-३’ लागू करण्याची घोषणा बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने केली. या घोषणेनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार असून अन्य भागांमधील रात्रीचा कर्फ्यू हटवण्यात आला आहे. विषय म्हणजे, या टप्प्यात ५ ऑगस्टपासून योगा प्रशिक्षण केंद्रे आणि व्यायामशाळांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय संबंधित राज्य सरकारांनी घ्यायचा आहे.
‘ऑनलॉक-३’ची घोषणा करताना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जावी, असे गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सांगितले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी राहील. संबंधित जिल्हाधिकारी तसेच राज्य सरकार या क्षेत्राची यादी संकेतस्थळांवरून प्रसिद्ध करतील. राज्य सरकार या क्षेत्रांमधील हालचालींवर लक्ष ठेवून असेल. तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही, यावर लक्ष ठेवावे, असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय आंतरराज्य आणि राज्यांतर्गत लोकांच्या प्रवासावर व मालवाहतुकीवर निर्बंध नसतील. यासाठी वेगळी परवानगी किंवा ई-परमिटच्या परवानगीची गरज नाही.

काय सुरू, काय बंद?
- सामाजिक अंतर आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी
- राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
- आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत मर्यादित प्रवासासाठी परवानगी
- प्रतिबंधित क्षेत्र आणि बाहेरही मेट्रो रेल, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, चित्रपटगृह, बार, सभागृह बंदच राहणार
- सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही