
पणजी : ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पहाटे निधन झालेल्या फादर बोलमॅक्स परेरा यांच्या पार्थिवावर बुधवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवचिकित्सा (पोस्टमॉर्टेम) करण्यात आली. शवचिकित्सा झाल्यानंतर बोलमॅक्सचा आजार व मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पर्यावरण चळवलीतील कार्यकर्ते फादर बोलमॅक्स यांच्या पार्थिवावर उद्या २८ मे रोजी केपे येथील होली क्रॉस चर्चमध्ये दुपारी ३ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. अंत्यसंस्कारापू्र्वी त्यांचे पार्थिव चिखली आणि केपे येथे त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रकृती अस्वाथ्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात फादर बोलमॅक्स परेरा यांना उपचारासाठी शनिवारी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार केले असले तरी काहीजणांनी उपचाराच्या पद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. शवचिकित्सा अहवालानंतर संशय दूर व्हायला मदत होणार आहे.
दरम्यान, राजकीय, सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.