म्हणाले-वडिलांनी जनसंघातूनच केली होती समाजकार्याला सुरुवात.

पणजी : माझ्या वडिलांनी जनसंघाच्या माध्यमातून सुरू केलेले समाजकार्य आजीवन सुरूच ठेवले. वडिलांसह नवी दिल्लीत सेवातीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे हा माझ्यासाठी परमोच्च समाधानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
मंगळवारी रात्री दिल्लीला रवाना झालेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे वडील पांडुरंग सावंत यांच्या समवेत पत्नी सुलक्षणा व मुलगीही उपस्थित होती.
चार दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह दिल्ली दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला गेल्याने या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. एसटी आरक्षणाच्या कार्यवाहीसह रिक्त मंत्रिपदाविषयी केंद्रीय नेत्यांबरोबर मुख्यमंत्री चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने विविध स्तरांवर कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.