कांकणभर

त्या सायकलवाल्यानं मुद्दामच ललिताला धडक दिली होती. तो प्रवीण होता. आपल्याच शाळेतला खोडकर मुलगा म्हणून त्याला सगळेजण ओळखत होते. आपण प्रवीणच्या थाडकन थोबाडीत ठेवून दिली होती आणि मग बेभानपणे आपण प्रवीणला ठोसे मारीत राहिलो होतो. त्याने क्षमायाचना मागितल्यावर आपण त्याला सोडून दिलं होतं.

Story: कथा |
13th April, 03:23 am
कांकणभर

सकाळी सूर्याची कोवळी किरणे सरिता रुग्णालयाच्या इमारतीवर पडत होती. वॉर्डात सगळे आपापली कामे उरकण्यात व्यस्त होते. रुग्णांना नाश्ता देणे, नाडी तपासणे, ताप पाहणे, औषधे देणे आणि इतर कामे सांभाळत असतानाच डॉक्टरांच्या राऊंडची वेळ जवळ येत होती. चार दिवसांपूर्वी एका रुग्णाला दाखल केले होते. त्याच्यासोबत फक्त एक वृद्ध बाई होती, बहुधा त्याची आई. दारूच्या अतिप्राशनामुळे त्याच्या लिव्हरला धोका निर्माण झाला होता. योग्य उपचारांनंतर तो आज थोडासा सुधारला होता.

"थोडासा भात खाणार का?" नर्सने विचारले.

"हो," तो कसातरी म्हणाला.

"नर्स, मला आता कुठलंही औषध नको. गोळ्या तर मुळीच नको."

"असं कसं चालेल? औषधं घ्यावीच लागतील!" नर्स म्हणाली.

"नको, खरंच नको. मला या जीवनाचा कंटाळा आलाय," त्याचा आवाज कापरा झाला.

"असं काहीबाही बोलू नका," नर्सने समजावले.

"कुणासाठी जगायचं? माझं या जगात कुणीच नाही!" तो गहिवरला.

"कुणीच नाही असं का म्हणता? तुमची आई आहे ना? त्या माऊलीने तुमच्यावर खूप प्रेम केलंय."

"खरंय, पण त्या जन्मदात्या आईला मी खूप त्रास दिला. तिचं कधी ऐकलं नाही. चुकीच्या मित्रांच्या संगतीने हे व्यसन लागलं," त्याचे डोळे पाण्याने भरले. तो पुढे बोलू शकला नाही. दीर्घ श्वास सोडून तो पुन्हा म्हणाला, "नर्स, मी खरंच वाईट माणूस आहे. कुणाचं ऐकलं नाही, चांगल्या मित्रांचंसुद्धा. त्याचीच फळं आज भोगतोय. माझ्यासारख्या दुष्ट माणसाला असंच झुरत मरायला हवं."

नर्स शांतपणे ऐकत होती. तिला त्याची दया येत होती.

"नर्स..." तो पुन्हा बोलला.

"अं?" नर्स भानावर आली.

"तुम्हाला माझा तिरस्कार वाटत असेल, ना?"

"नाही, मुळीच नाही," नर्स म्हणाली.

"खरंच? मी दारुडा आहे, आणि तुम्हाला माझा तिरस्कार वाटत नाही? दारू हे वाईट व्यसन आहे हे मलाही कळतं, पण आता पश्चाताप करून काय उपयोग? सांगा, माझ्यासारख्या माणसाने कसं जगावं? मला काही सुचत नाही!"

"माझं ऐकाल तर..." नर्स म्हणाली.

"दारू सोडावी म्हणाल, पण त्याचा काही उपयोग नाही. शपथा घेऊनही मी पुन्हा दारूला हात लावला."

"तुम्ही दारू सोडली नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही. मनापासून ठरवलं तर दारू सोडणं शक्य आहे."

"ते कसं शक्य आहे?"

"तुमच्या लिव्हरवर परिणाम झालाय. आता दारू सोडावीच लागेल, नाहीतर..."

"नाहीतर मी जगणार नाही, ना? मला आता जगायचंच नाही!"

"तुम्हाला मरायला का वाटतं?"

"जगावंसं वाटत नाही म्हणून."

"पण जगावं असं का वाटत नाही?"

"जगू कोणासाठी?"

"तुमच्या आईसाठी नाही का? तुमच्या बहिणीसाठी?"

"मला बहीण कुठे आहे? मला बहीण नाही."

"मी तुम्हाला भाऊ म्हटलं तर मला बहीण मानणार नाही?"

"तुम्ही माझी बहीण? खरंच?"

"तुमची बहीण होण्यात मला आनंदच वाटेल!"

"का?"

"कारण मलाही भाऊ नाही!" नर्स गप्प झाली. तिचे डोळे पाणावले. तिच्या ओठांजवळचा तीळ रुग्णाच्या नजरेस पडला. त्याच्या मनात एक अस्पष्ट प्रतिमा तरळली. ‘ही तीच का? पण ती कशी असेल? ती हीच आहे याची खात्री कशी?’ त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला. तिची बोलताना दाताखाली ओठ रुतवण्याची सवय त्याला आठवली. ‘तीच ही ललिता!’ त्याची खात्री झाली.

त्याला एक प्रसंग आठवला. दहावीत असताना ललिता मैत्रिणींसोबत घरी जात होती. हातात पुस्तकांचा गठ्ठा होता. हसतखेळत चालत असताना एका सायकलवाल्याने तिला मुद्दाम धडक दिली. ललिता खाली पडली, तिची पुस्तके विखुरली. ती आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या. ललिताला रडू कोसळलं. तेव्हा तो, प्रशांत, तिथे आला. त्याने सायकलवाल्या प्रवीणला चांगलंच सुनावलं, त्याला ठोसा मारला. प्रवीणने माफी मागितल्यावर त्याने त्याला सोडलं. ललिताची पुस्तके गोळा करून तिला दिली आणि म्हणाला, "घ्या, घाबरू नका. ही श्रीमंतांची पोरं अशीच!" ललिता आणि तिच्या मैत्रिणी धन्यवाद देऊन निघून गेल्या.

‘तीच ही ललिता!’ प्रशांतची खात्री झाली.

"तुम्ही वाड्याच्या हायस्कूलमध्ये शिकत होता का?" प्रशांतने विचारले.

नर्स चपापली, पण बोलण्याआधीच डॉक्टरांनी तिला बोलावलं. ती दुसऱ्या वॉर्डात गेली. प्रशांतच्या डोळ्यांसमोर शाळेतल्या आठवणी तरळू लागल्या. त्याची खात्री पक्की झाली, हीच ती ललिता!

ललिता सरिता रुग्णालयात काम करत होती. रुग्णालयातच तिला निवास, जेवण, कपडे सर्व मिळत होते. ड्युटीवरून खोलीवर येताना ती त्या रुग्णाबद्दल विचार करत होती. ‘त्याने वाड्या हायस्कूलचा उल्लेख केला. हा प्रशांत तर नाही ना?’ तिला प्रवीणने ढकलल्याचा प्रसंग आठवला. ‘तेव्हा प्रशांतमुळेच मी वाचले. पण हा तोच प्रशांत असेल का? तो अशा व्यसनाधीन अवस्थेत? कोणी केलं त्याला असं?’ तिच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं. वाड्यातल्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर सरकू लागल्या.


प्रमोद कांदळगावकर
देवगड, ९३७२०८९३१४