गोवा विद्यापीठातर्फे आयोजन : महिला-पुरुष दोन्ही गटात विजेतेपद
पणजी : सेंट झेवियर्स कॉलेज म्हापसाने २०२४-२५ मध्ये पुरुष आणि महिला हँडबॉल आंतरमहाविद्यालयीन चॅम्पियनशिप जिंकली. स्पर्धा गोवा विद्यापीठातर्फे गोवा विद्यापीठ मैदान, ताळगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
पुरुषांच्या स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स कॉलेज म्हापसाने व्हीव्हीएमच्या श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मडगावचा २४-२० असा पराभव केला. महिलांच्या स्पर्धेत सेंट झेवियर्स कॉलेजने रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स नावेलीचा ८-६ असा पराभव केला.
तत्पूर्वी महिला गटाच्या उपांत्य फेरीत रोझरी कॉलेजने सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय साखळीचा १०-३ असा पराभव केला आणि सेंट झेवियर्स कॉलेजने डॉन बॉस्को कॉलेज पणजीचा ९-४ असा पराभव केला. पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत श्री दामोदर कॉलेजने एस. एस. धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचा ११-९ असा पराभव केला आणि सेंट झेवियर्स कॉलेजने डॉन बॉस्को कॉलेज पणजीचा २०-१८ असा पराभव केला.
जबीउल्ला, गौरी ठरले उत्कृष्ट खेळाडू
सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार श्री दामोदर कॉलेज मडगावच्या जबीउल्ला बंकापूरला आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार म्हापसाच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या गौरी शेटगावकरला मिळाला. या ४ दिवसांच्या आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत एकूण २३ पुरुष आणि १९ महिला संघांनी भाग घेतला.
बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक रोझरी कॉलेज नावेली डॉ. फ्रान्सिस लोबो आणि सन्माननीय अतिथी महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक पी.सी.सी.ई. कॉलेज वेर्णा उगम प्रभुदेसाई आणि महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक डॉन बॉस्को कॉलेज अभियांत्रिकी फातोर्डा क्लिफर्ड ब्रिटो यांनी गोवा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सहाय्यक संचालक बालचंद्र जादर यांच्यासमवेत विजेत्यांना आणि उपविजेत्यांना पदके आणि ट्रॉफी प्रदान केल्या.