विदेशातून फोनवरच दिला तलाक; मामेभावाशी हलाला करण्यास पाडले भाग! पोलिसांत तक्रार दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 12:18 pm
विदेशातून फोनवरच दिला तलाक; मामेभावाशी हलाला करण्यास पाडले भाग! पोलिसांत तक्रार दाखल

लखनऊ : भारतात तिहेरी तलाक आणि हलाला प्रथांवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. असे असताना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून तिहेरी तलाक आणि हलालाचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेला पतीने विदेशातूनच फोनवर तिहेरी तलाक दिल्याने ती हवालदिल झाली. तिने कसेबसे पती आणि सासरच्यांची मनधरणी केली. त्यावर उपाय म्हणून पतीच्या मामाच्या मुलासोबत बळजबरी हलाला करण्यास भाग पाडले. तरीही गुंता सुटला नाही. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रारी दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या महिलेचा विवाह १५ वर्षांपूर्वी चरथवळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पावटी गावातील वसीमचा मुलगा नसीमशी झाला होता. पीडित महिलेला लग्नानंतर तीन मुलेही आहेत. एक वर्षापूर्वी पती नसीम याने कुवेतहून फोनवर क्षुल्लक कारणावरून तिहेरी तलाक दिल्याने शरिया कायद्यानुसार तिला वेगळे करण्यात आले. याविषयी तिने तक्रारीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी पती घरी आल्यानंतर तिने त्याची आणि सासरच्या लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांशी बैठक झाली, तेव्हा पतीच्या मामाच्या मुलाशी हलाला करण्यास सासरच्यांनी दबाव घातला. त्यानुसार मुलांसाठी तिने पतीच्या मामाच्या मुलाशी हलाला केला. याच काळात मोठ्या मुलाला सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याने तो हलाला सुरू असलेल्या घरी आईकडे आला. त्यानंतर सासरच्या मंडळींना पतीची पुन्हा निकाह करण्याची विचारणा केली असता, त्यांनी नकार दिला. तसेच पतीने दुसरे लग्न केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा