हुंडाबळीत मृत झालेली पत्नी सापडली प्रियकरासोबत; पतीने अकारण भोगला ३५ महिने तुरुंगवास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th May, 02:41 pm
हुंडाबळीत मृत झालेली पत्नी सापडली प्रियकरासोबत; पतीने अकारण भोगला ३५ महिने तुरुंगवास

गोपालगंज : बिहारमधील गोपालगंजमध्ये अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली महिलेचा पती ३५ महिने आणि सासू ७ महिने तुरुंगात होती. आता ती महिला तिच्या प्रियकरासह जिवंत सापडली आहे. या घटनेनंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. त्यांनी महिलेला बलिया गावातून तत्काळ अटक केली आहे. यामुळे तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हुंडाबळी प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

बरौली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नाधना गावातील रहिवासी लता देवी हिचा विवाह नगर पोलीस स्थानकाच्या अरार परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये राहणाऱ्या सुनील चौहान याच्याशी झाला होता. लग्नानंतर लता आणि सुनील यांना दोन मुली झाल्या. यामध्ये एक मोठी मुलगी तिच्या मामाकडे राहते. दुसरी लहान मुलगी तिच्या आजी आणि वडिलांसोबत राहते. २०१६ मध्ये महिलेने पती आणि सासरच्यांविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता.

जुलै २०२१ मध्ये झाली होती हुंडाबळीची तक्रार

लॉकडाऊन दरम्यान पती-पत्नीमध्ये करार झाला होता. महिला सासरच्या घरी येऊन राहू लागली. येथे, लता देवीचा भाऊ चंद्रभूषण प्रसाद याने १० जुलै २०२१ रोजी हुंड्यासाठी तिची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप केला होता. २५ जुलै २०२१ रोजी शहर पोलीस स्थानकात याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. हुंडाबळी प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती सुनील चौहान, मेहुणा धर्मराज प्रसाद, देवराज चौहान, राहुल चौहान, सासू आशा देवी यांच्यासह पाच जणांना आरोपी केले होते.

निर्दोष असूनही आई-मुलगा तुरुंगात गेले

लतादेवीच्या हत्येप्रकरणी तिची सासू आणि पती निर्दोष होते. हे सिद्ध करण्यासाठी ३५ महिने लागले. कुटुंबीय दिवाणी न्यायालयातून उच्च न्यायालयात गेले. मात्र, पती सुनील चौहान याला जामीन मिळाला नाही. शेवटी त्याला ३५ महिने तुरुंगाची हवा खावी लागली. आता कोणाच्या निष्काळजीपणामुळे त्याला ३५ वर्षे तुरुंगात रहावे लागले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा नीट तपास झाला असता तर हे प्रकरण खूप आधी उघडकीस आले असते आणि त्या निर्दोष पतीला ३५ महिने तुरुंगात राहावे लागले नसते. आता ही महिला जिवंत असून प्रियकरासोबत संसार करत असल्याचे समजल्यावर पोलीसही चक्रावून गेले.

पोलिसांनी लतादेवीला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्थानकात आणले असता तिने दुसरे लग्न केल्याचे उघडकीस आले. यूपीच्या बलियामध्ये तिने बस ड्रायव्हरशी लग्न केल्याचे सांगितले. त्याच्यापासून तिला एक मुलगीही झाल्याचे समोर आले. या महिलेला आता या पद्धतीने तीन मुली झाल्या आहेत.

या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये तिने हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता, तेव्हापासून तिला सासरच्या घरातून छळ होत होता. त्यामुळे तिने घर सोडले होते. तिथे बलिया येथील नागेंद्र साहनी याने तिला आधार दिला. तेव्हापासून त्यांच्यात प्रेमाचे संबंध जुळले. चार महिन्यांनंतर बलिया येथे पती-पत्नी म्हणून राहू लागले, असेही समोर आले आहे. या महिलेला आता न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

हेही वाचा