२६ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) सरकारच्या विविध खात्यांमधील ३६ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये एकट्या आरोग्य खात्यातील २४ जागांचा समावेश आहे; तर तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि खाण खात्यातील प्रत्येकी ४ जागांवर भरती केली जाईल. या सर्व जागांसाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जून २०२६ पर्यंत आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व अटी व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
खालील लिंकवर क्लिक करावे.
https://gpsc.goa.gov.in/wp-content/uploads/2026/06/Advt.-No.-06-Year-2026-website.pdf
आरोग्य खात्यांतर्गत होमिओपॅथी डॉक्टरांच्या १५ जागा भरल्या जाणार असून, यातील ८ जागा अनारक्षित (खुला प्रवर्ग) आहेत. या पदासाठी उमेदवाराकडे होमिओपॅथी विषयातील पदवी, केंद्रीय अथवा राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी तसेच तीन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी 'पे मॅट्रिक्स १०' प्रमाणे वेतन दिले जाईल. याशिवाय, इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्युमन बिहेविअर (आयपीएचबी) मध्ये सहाय्यक फार्मास्युटिकल केमिस्टची १ जागा, तर सायकियाट्रिक नर्सिंग आणि सायकियाट्रिक सामाजिक कार्य विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अनुक्रमे १ आणि २ जागा भरल्या जाणार आहेत.
गोवा दंत महाविद्यालयात ओरल पॅथॉलॉजी विषयाच्या लेक्चरर पदासाठी १ जागा, तर आरोग्य विभागात विविध तीन विषयांच्या सहाय्यक प्राध्यापकांची प्रत्येकी १ आणि वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञाची १ जागा भरली जाईल. सरकारी महाविद्यालयांमध्ये भूगोल, वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयांच्या सहाय्यक प्राध्यापकांची प्रत्येकी १ जागा भरली जाणार आहे. तसेच, सरकारी पॉलिटेक्निकमध्ये फूड टेक्नॉलॉजी (अन्न तंत्रज्ञान), सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयांसाठी प्रत्येकी एका लेक्चररची भरती केली जाईल; तर खाण खात्यात सहाय्यक अभियंता, जिओलॉजिस्ट (भूवैज्ञानिक) आणि कायदा अधिकाऱ्याची भरती केली जाणार आहे.
सर्व पदांसाठीचे अर्ज शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरीत्या भरल्यावरच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पुढील भरती प्रक्रिया राबवली जाईल. अपवाद वगळता सर्वच पदांसाठी उमेदवाराला कोकणी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. बहुतेक पदांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेबाबतचा अधिक सविस्तर तपशील आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.