वनखात्याने मोबाईल केला जप्त : उत्तरप्रदेशातील युवकाचा कारनामा

मडगाव : गोव्यातील (Goa) फातोर्डा (Fatorda) परिसरात बिबट्याचा (Leopard) वावर असल्याबाबत फोटो व्हायरल होत होते. तो फोटो एआय जनरेटेड (AI generated Photo) व एडिट फोटो असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत वन खात्याने केलेल्या चौकशीत उत्तरप्रदेशातील गौतम कुमार याने केवळ मौज म्हणून प्रकार केल्याचे सांगितले. वन खात्याने या युवकाचा मोबाईल संच जप्त केला आहे.
फातोर्डा परिसरात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ व आमदार विजय सरदेसाई यांच्या घरा नजीकच्या भागात बिबट्याचा वावर असल्याचे फोटो रविवारी समाजमाध्यमावर व्हायरल होत होते.
याबाबत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही केले जात होते. यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवत सदर घटनेची शहानिशा करावी, अशी सूचना केली होती.
त्यानुसार वन विभागाने केलेल्या चौकशीत बिबट्या फातोर्डा परिसरात आल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. हा फोटो कुठून आला याचा तपास केला असता मूळ उत्तरप्रदेश येथील गौतम कुमार याने सदर जागेचे फोटो मित्राला पाठवून त्या ठिकाणी बिबट्याचा फोटो एडिट करून घेतल्याचे समोर आले.
वन खात्याने गौतम कुमारचा मोबाईल तपासणीला घेतला असता हा सर्व प्रकार समजला व बिबट्या फिरत असल्याची गोष्ट खोटी असल्याचे समजले. वन खात्याने गौतमकुमार याचे आधारकार्ड घेत मोबाईल जप्त केला आहे.
गौतम कुमार याने हा प्रकार आपण केल्याचे कबुल करताना केवळ गंमत म्हणून हा प्रकार केला होता. मित्राकडून फोटो एडिट करून घेतला व समाजमाध्यमावर टाकल्याचे सांगितले. यामुळे एवढ काही होईल याची कल्पना नव्हती असेही सांगितले.
अशा प्रकारच्या एआय जनरेटेड व एडिट फोटोंमुळे लोकांमध्ये भीती पसरत असल्याने अशी कोणतीही खोटी माहिती समाजमाध्यमावर पसरवू नये असे आवाहन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.